For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोती तलावाचे पाणी वाया जात नसल्याचा पालिकेचा खुलासा; आउटलेटमधून ड्रेनेजचे गढूळ पाणी वाहत असल्याचा दावा

03:51 PM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोती तलावाचे पाणी वाया जात नसल्याचा पालिकेचा खुलासा  आउटलेटमधून ड्रेनेजचे गढूळ पाणी वाहत असल्याचा दावा
Advertisement

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील मोती तलावाचे पाणी वाया जात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. मोती तलावातील पाणी पूर्णपणे साठवून ठेवण्यात आले असून, तलावाचे पाणी बाहेर जात नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तलावाच्या आउटलेटमधून सध्या वाहणारे पाणी हे तलावातील नसून जुन्या भूमिगत ड्रेनेज व्यवस्थेतील गढूळ पाणी असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

पालिका प्रशासनाचे अधिकारी वैभव अंधारी यांनी सांगितले की, शहरात पाणी बचतीसाठी नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वीच मोती तलावाचे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे तलावातील पाण्याचा कोणताही अपव्यय होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तलावाचे दरवाजे पूर्णपणे बंद

नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी सांगितले की, शहरातील पाण्याचा अपव्यय होणार नाही, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची प्रशासनाला जाणीव असून, पावसाचे प्रमाण कमी होताच तलावातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजे बंद करण्यात आले होते.

Advertisement

आउटलेटमधून वाहणारे पाणी ड्रेनेजचे

मोती तलावाच्या आउटलेट भागातून बाहेर पडणारे गढूळ पाणी हे तलावातील पाणी नसून, अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या नाल्यातील पाणी असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. सध्या या पाण्याला अडविण्याची स्वतंत्र व्यवस्था नसली तरी भविष्यात त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचा विचार नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तलावाचे पाणी बाहेर जात असल्याच्या चर्चेत तथ्य नसून, आउटलेटमधून दिसणारे पाणी हे ड्रेनेज व्यवस्थेतील असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

गढूळ पाण्याच्या पुनर्वापराचा विचार

जुन्या ड्रेनेजमधून वाहून जाणाऱ्या गढूळ पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा भविष्यात पुनर्वापर करता येईल का, याबाबतही नगरपालिका प्रशासनाकडून विचार सुरू असल्याचे नगराध्यक्ष सावंत-भोसले यांनी सांगितले.

दरम्यान, मोती तलावातील पाणीसाठा सुरक्षित असून त्याचा अपव्यय होत नसल्याचा पालिका प्रशासनाचा खुलासा समोर आल्याने या विषयावरील चर्चेला आता वेगळे वळण मिळाले आहे.

Advertisement

.