For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीचा शतायुषी भगवान महावीर दवाखाना बंद करू नका ;नगरसेवक देव्या सूर्याजी यांची नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा; दहा बेडची सुविधा व दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी

सावंतवाडीचा शतायुषी भगवान महावीर दवाखाना बंद करू नका  नगरसेवक देव्या सूर्याजी यांची नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा  दहा बेडची सुविधा व दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील शंभर वर्षांची आरोग्यसेवेची परंपरा जपणारा भगवान महावीर आयुर्वेद व टी.बी. दवाखाना बंद करू नये, अशी मागणी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन निवेदन साद केले. तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याशीही चर्चा करून दवाखान्याची सेवा अखंडित ठेवण्याची मागणी केली.

Advertisement

दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर सेवानिवृत्त होत असल्यास त्यांच्या जागी कंत्राटी अथवा नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविणे आवश्यक होते. प्रक्रियेला विलंब झाला असला तरी आता तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवून वैद्यकीय सेवा सुरू ठेवावी, अशी मागणी सूर्याजी यांनी केली.

सावंतवाडी नगरपरिषदेची हद्द चराठे, माजगाव, कोलगाव आदी भागांच्या दिशेने विस्तारत असताना नागरिकांना मिळणाऱ्या नागरी सुविधा कमी करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे भगवान महावीर दवाखान्यात किमान दहा बेडची सुविधा उपलब्ध करून दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांना परवडणारी आणि नियमित आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील औषधनिर्माता, फार्मासिस्ट तसेच दवाखान्यातील अन्य पदे कायम ठेवावीत. दवाखाना बंद अथवा विलीन केल्यास नगरपरिषदेच्या कायम आस्थापनेवरील कर्मचारी संख्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करावेत, असे सूर्याजी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान जन औषधी केंद्राची संकल्पना पुढे नेत सावंतवाडी नगरपरिषदेने हे केंद्र याच दवाखान्यात सुरू करावे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, गोरगरीब, कष्टकरी, महिला आणि वृद्धांना कमी किमतीत औषधे उपलब्ध होतील, अशी सूचनाही त्यांनी केली.

एकीकडे आयुषचे केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे नगरपरिषदेचा भगवान महावीर आयुर्वेद दवाखाना बंद होणे योग्य नाही. तसेच शासनाकडून क्षयरोगमुक्त भारत अभियान राबविले जात असताना टी.बी. दवाखान्याची सेवा बंद करणे हे शासनाच्या आरोग्य धोरणाशी विसंगत ठरेल. त्यामुळे दवाखाना बंद न करता त्याची सेवा अधिक सक्षम करावी, अशी मागणी सूर्याजी यांनी निवेदनातून केली.

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषदेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. दवाखान्यातील पदे अस्थायी स्वरूपाची असल्याने याबाबत सभागृहात निर्णय घेण्यात येईल. शहरातील नागरिकांना मिळणारी आरोग्यसेवा कायम राहण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिले.

यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे प्रथमेश प्रभु, वसंत सावंत, वैभव दळवी, ओंकार सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement

.