दडपशाहीविरोधात कवींनी सत्याची बाजू मांडावी : ज्येष्ठ कवी वीरधवल परब; सावंतवाडीत 50 वे सुवर्णमहोत्सवी कोजागरी कवी संमेलन उत्साहात
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर आणि सिंधुदुर्ग साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 50 व्या सुवर्णमहोत्सवी कोजागरी कवी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी सायंकाळी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
कविता म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे
कविता ही केवळ रोमँटिक वातावरण निर्माण करणारी कलाकृती नसून ती एक वैचारिक कृती आणि चिंतनाचे माध्यम आहे, असे परब यांनी सांगितले. समाजातील अन्याय, दडपशाही आणि विविध प्रश्नांकडे कवीने दुर्लक्ष करू नये. सामाजिक वास्तवावर भाष्य करून सत्य निर्भीडपणे मांडणे ही कवीची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यासपीठावर प्रा. प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिराचे कार्यवाह रमेश बोंद्रे, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, सचिव मनोहर परब आणि संचालक राजेश मोंडकर उपस्थित होते. यावेळी वीरधवल परब यांचा रमेश बोंद्रे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्रा. प्रवीण बांदेकर यांनी कवी वसंत सावंत यांनी सुरू केलेली कोजागरी कवी संमेलनाची परंपरा सावंतवाडीकरांनी गेली 50 वर्षे सातत्याने जपल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कोकणच्या वास्तवाचे कवितेतून दर्शन
कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. या साहित्यिक वातावरणात सावंतवाडी, कणकवली, कुडाळ आदी भागांतील कवींनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
दुष्काळ, जमिनींची विक्री, निसर्गाचा ऱ्हास, पाण्याची समस्या आणि कोकणातील बदलते सामाजिक वास्तव या विषयांवर कवितांमधून भाष्य करण्यात आले. 'इरी इरी पापरी', 'दुष्काळ', 'शाळा', 'पापाचा घडा', 'मरण बरं', 'नाते', 'डोंगर खचतो आहे' आणि 'पाणी' अशा विविध आशयांच्या कवितांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले.
कवी राजेश कदम आणि तन्वी परब यांनी प्रभावी व ओघवत्या निवेदनातून संमेलनाची रंगत वाढवली. सलग दोन तासांहून अधिक काळ त्यांनी रसिकांना कवितांच्या विश्वात गुंतवून ठेवले.
श्रुती राऊळ आणि तन्वी परब यांचा गौरव
उत्कृष्ट कविता वाचनाबद्दल लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सावंतवाडी शाखेतील कर्मचारी श्रुती राऊळ आणि 'तरुण भारत डिजिटल – संवाद'च्या तन्वी परब यांना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या संमेलनात भाऊ गोसावी, श्रुती राऊळ, तन्वी परब, किशोर वालावलकर, ॲड. नकुल पार्सेकर, मनोहर परब, कोल्हापुरे, वंदना करंबेळेकर, श्रद्धा नाईक, योगिता शेटकर, शायरी ठाकूर, श्वेतल परब, मनीषा, सरिता पाटील, सरिता पवार, विठ्ठल कदम आदी कवींनी काव्यवाचन केले.
सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या कवी संमेलनाला मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोते उपस्थित होते. कवितेच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडण्याची परंपरा पुढे नेण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.
