सावंतवाडी मतदारसंघात 50 वनराई बंधाऱ्यांचे महाअभियान; वेतोरेत पहिल्या बंधाऱ्याचा शुभारंभ
सावंतवाडी | प्रतिनिधी : भविष्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि जलसंधारणाला गती देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 50 वनराई बंधारे उभारण्याच्या महाअभियानाला सुरुवात करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा शुभारंभ 2 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे-गुरव टेंबवाडी येथे विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ उद्घाटनापुरते मर्यादित न राहता विशाल परब यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून पहिल्या वनराई बंधाऱ्याच्या कामात सहभाग घेत अभियानाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये टप्प्याटप्प्याने 50 वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळी वाढवणे आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई कमी करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
जलसंधारणाची कामे केवळ प्रशासनाच्या माध्यमातून न करता त्यामध्ये नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून लोकचळवळ उभी करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून गावागावात जलसंधारणाची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांशी साधला संवाद
पहिल्या वनराई बंधाऱ्याचे काम सुरू केल्यानंतर विशाल परब यांनी परिसरातील शेतीची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणीविषयक अडचणी आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. शेतकऱ्यांसोबत शेताच्या बांधावरच त्यांनी न्याहारी केली. त्यांच्या या साधेपणाचे आणि शेतकऱ्यांशी असलेल्या संवादाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या उपक्रमामुळे पावसाळ्यातील पाण्याचा अधिक प्रभावी वापर होण्यासोबतच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मोठ्या संख्येने उपस्थिती
वेतोरे येथे झालेल्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेटये, सदानंद गिरप, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, माजी तालुकाध्यक्ष बाळा सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय शैलेश जामदार, समीर कुडाळकर, शक्ती केंद्रप्रमुख सुधीर गावडे, बूथ अध्यक्ष विरोचन धुरी, दीपक करंगुटकर, आबा येरम, सूर्याजी नाईक, ग्रामपंचायत सदस्य विक्रम सावंत, ताता गावडे, एसटी प्रवासी संघटनेचे श्री. वेतोरकर, प्रशांत नाईक, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, सुनील गडेकर, सुनील घाग यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, तरुण, भाजप कार्यकर्ते आणि जलसंधारण क्षेत्रात काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.