सावित्री जिंदल यांनी वाढविले भाजपचे टेन्शन
अपक्ष उमेदवारीची केली घोषणा
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जारी केली आहे. या यादीत सावित्री जिंदल यांना स्थान मिळालेले नाही. अशा स्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्री जिंदल या भाजपच्या तिकिटावर हिसार मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होत्या. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. माझी ही अखेरची निवडणूक असून मी जनतेची सेवा करू इच्छिते असे सावित्री जिंदल यांनी म्हटले आहे. हिसार मतदारसंघात भाजपने डॉ. कमल गुप्ता यांनी उमेदवारी दिली आहे. याचमुळे सावित्री यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. सावित्री जिंदल यांचे पुत्र नवीन जिंदल हे कुरुक्षेत्रचे खासदार आहेत.
चालू वर्षीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवीन जिंदल यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावित्री जिंदल या देशाच्या सर्वात धनाढ्या महिलांच्या यादीत सामील आहेत. 2023 मध्ये जिंदल समुहाची संपत्ती 29.1 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे मानले गेले होते. सावित्री यांचे पती ओमप्रकाश जिंदल यांचा 2005 साली एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर सावित्री जिंदल यांनी राजकारणात पाऊल ठेवले होते. त्यादरम्यान त्यांनी हिसार विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. त्यानंतर 2009मध्ये त्यांनी पुन्हा हिसारमध्ये विजय मिळविला होता. तर 2014 मध्ये सावित्री यांनी भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांनी याच मतदारसंघात पराभूत केले होते.