आत्महत्या करणाऱ्या मायलेकीस वाचवले; कराडात कृष्णा पुलावरील प्रकार
निर्भया पथकाचे प्रसंगावधान
कराड प्रतिनिधी
घरगुती भांडणाला कंटाळून सहा महिन्यांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मायलेकीस निर्भया पथकाने वाचवले. कराडच्या नव्या कृष्णा पुलावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या महिलेस समजावून सांगत पोलीस उपअधिक्षक कार्यालयात आणण्यात आले. उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी त्या महिलेची अडचण जाणून घेत त्यांना समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान एका सहा महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा जीव वाचवण्याचे प्रसंगावधान दाखवल्याबद्दल नागरिकांनीही पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांच्या पथकाचे कौतुक केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडच्या रूक्मिणीनगर परिसरातील एका तीस वर्षीय महिलेचे घरात भांडण झाले. या रागातून ती अवघ्या सहा महिन्याच्या मुलीस घेऊन घराबाहेर पडली. जीवन संपवण्याच्या उद्देशाने ती कराड-विटा रोडवरील नव्या कृष्णा पुलावरून चालत निघाली होती. सुदैवाने याचवेळी पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांना विद्यानगर येथे एका मुलीचा छेडछाडीसंदर्भात फोन आल्याने त्यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांना निर्भया पथकाला पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. अमित बाबर यांनी खातरजमा केल्यावर निर्भया पथकाच्या पोलीस दीपा पाटील, अमोल फल्ले यांच्यासह पोलीस विद्यानगरकडे रवाना झाले.
कृष्णा पुलावरून जाताना पुलाच्या मध्यावर एक महिला सहा महिन्याच्या मुलीसह नदीपात्रात उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलीस गाडी थांबवली. त्या महिलेच्या दिशेने धावत जाऊन त्यांनी महिलेस कठड्यावर चढण्यापासून प्ररावृत्त केले. पोलिसांनी सहा महिन्याच्या मुलीस तिच्या आईकडून घेतले. रागाच्या भरात असलेली ती आई पोलिसांचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेर निर्भया पथकाच्या पोलिसांनी तिला समजावून सांगत पोलीस उपअधिक्षक कार्यालयात आणले. उपअधिक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी त्या महिलेची परिस्थिती ओळखून तिला समजावून सांगत तिच्या अडचणी समजून घेतल्या. तिच्या कुटूंबियांना बोलवून घेत ठाकूर यांनी खडेबोल सुनावले. या सर्वांचे समूपदेशन करण्याच्या सूचना ठाकूर यांनी दिल्या. त्यानंतर त्या महिलेसह तिच्या पतीचे समूपदेशन करण्यात आले. तिची ज्या व्यक्तीबद्दल तक्रार होती ती नोंदवून घेण्यात आली. निर्भया पथकाच्या या प्रसंगावधानाने नेमकेपणाने जगही न समजलेल्या अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा जीव वाचला.
छेडछाड झाल्यास तक्रार द्या
जीवन संपवायला निघालेल्या मायलेकीस निर्भया पथकाने वाचवले हे चांगले झाले. समाजात महिला, मुलींच्याबाबत अशा अनेक घटना घडत असतात. अशा घटनांमध्ये दहशतीला न घाबरता महिला, मुलींनी निर्भया पथकाकडे थेट तक्रारी दाखल कराव्यात. संबंधितांवर कारवाई केली जाईल. शिवाय मुलींना यापुढे त्रास होणार नाही याचीही कायद्याच्या चौकटीत काळजी घेतली जाईल. त्यामुळे न घाबरता तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी केले.