आम्हाला १५०० रुपये नको; पण आमची शेती वाचवा.. लाडक्या बहीणींचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणं
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बाधित शेतकरी आक्रमक
कोल्हापूर
राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला. मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरुच आहे. या महामार्गाला विरोध करत १२ जिल्ह्यांतील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी महामार्ग मुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा एल्गार पुकारण्यात आला आहे.