For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

४० हजार झाडांच्या घोषणांपेक्षा विद्यमान वृक्ष वाचवा

05:48 PM Jun 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
४० हजार झाडांच्या घोषणांपेक्षा विद्यमान वृक्ष वाचवा
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 90
Advertisement

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा भाजपला सवाल 

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पर्यावरणाबाबत वाढत असलेली जनजागृती ही सकारात्मक बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र, सत्ताधारी भाजपने जनकल्याण अभियानांतर्गत जिल्हाभरात "एक झाड आईच्या नावाने" या उपक्रमातून ४० हजार झाडे लावण्याची घोषणा केली असली, तरी विद्यमान वृक्षसंपदा वाचविण्याबाबत पक्षाची भूमिका काय आहे, असा सवाल पर्यावरण अभ्यासक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.डॉ. परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जाईल आणि त्याला प्रसिद्धीही मिळेल. मात्र, जिल्ह्यात विशेषतः सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेने समृद्ध जंगलांमध्ये सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीला कोणाचा आशिर्वाद आहे, याचा शोध घेण्यासाठी भाजपचे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढाकार घेणार आहेत काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Advertisement

तसेच प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे ज्या तेरा गावांमधून मार्ग जाणार आहे, त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीबाबतही भाजपने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामादरम्यान बांदा ते खारेपाटण दरम्यान लाखो झाडांची कत्तल झाली होती. त्या बदल्यात लावण्यात आलेल्या झाडांपैकी एक तरी झाड आज उभे आहे का, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले."वृक्षारोपण हे निश्चितच आवश्यक आहे; मात्र आधीपासून अस्तित्वात असलेले मोठमोठे वृक्ष वाचवणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे," असे मत व्यक्त करत पर्यावरण संवर्धनासाठी केवळ घोषणांपेक्षा कृतीची गरज असल्याचे डॉ. परुळेकर यांनी अधोरेखित केले

Advertisement
Tags :

.