For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावरती इंडिया!

06:57 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावरती इंडिया
Advertisement

विरोधकांच्या एकजूट होण्यात बिहारचे नितीश कुमार आणि बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकेमुळे जोराचा धक्का बसून या महिन्यात भाजप अधिक सशक्त होत असल्याचे चिन्ह दिसू लागले होते. त्यातच बसप प्रमुख मायावती, लोकदलाचे जयंत चौधरी असे धक्के बसल्याने उत्तर भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीची डाळ शिजणार नाही असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महिनाअखेर येता येता इंडिया आघाडीही सावरायला लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोदी यांना सहज विजयाच्या जवळ जाऊ द्यायचे नाही. अखेरपर्यंत सत्तापालट करण्याच्या शक्यता आणि एकजुटीने आपले वातावरण निर्माण करण्याचा विचार ही आघाडी करू लागली आहे. त्यातच भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आला तर प्रादेशिक पक्ष आणि विरोधकांना ते संपवून टाकतील या शक्यतेने विरोधकांची एकजूट होऊ लागली आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाने उत्तर भारतात काँग्रेसबरोबर यासाठी निर्माण केलेला समन्वय आणि तडजोडीने जागा वाटप करण्यात घेतलेली आघाडी लक्षात घेतली तर ज्या पट्ट्यात भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतात तेथेच त्यांना आव्हान उभे राहू लागले आहे, याकडे भाजपलाही दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेष म्हणजे काँग्रेस अनेक ठिकाणी दोन पावलं मागे जाण्यास तयार होणे आणि त्यांनी प्रादेशिक पक्षांचे म्हणणे मान्य करणे हे जितके आश्चर्यकारक आहे तेवढेच दिल्लीच्या जागावाटपात जिथे भाजप किंवा काँग्रेस अशा एकतर्फी सात लोकसभा मतदार संघांचा जनता निर्णय देते तिथे, पंजाबमध्ये आणि गुजरातमध्ये सुध्दा काँग्रेसने आप बरोबर तडजोडीची तयारी दर्शवणे म्हणजे पूर्वी झालेल्या चुकांची सुधारणा करत आहोत हा संदेश जनतेत पोहोचवण्यासारखेच आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत विरोधकांचे विखुरणे आणि विधानसभेला एकत्र येऊनही मतदारांनी या आघाडीतील दुसऱ्या पक्षाला मत नाकारल्याने डाव फसला होता. मात्र यावेळी मायावती यांना सोडून अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आले. काँग्रेसने मर्यादित जागा लढवण्याची तयारी दर्शवली आणि 17 जागांवर समाधान मानले. हेच आपने पंजाब, हरियाणा, गोवा, गुजरातमध्ये वाटाघाटीत यश मिळवून काँग्रेसशी तडजोड केली. त्यामुळे उत्तर भारतात सत्ताधारी भाजपला हा धोक्याचा इशारा दिसू लागला असून लवकरच त्यामुळे उत्तरेत काही राजकीय घडामोडी गतिमान झाल्या तर आश्चर्य वाटण्याचे अजिबात कारण नाही. त्यात मनीष शिसोदिया यांच्या सुटकेची वाट पाहत आपल्या चौकशीला पुढे पुढे ढकलत चाललेल्या अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीत अटक करायची किंवा कसे याचा निर्णय न्यायालयीन कचाट्यात अडकला असल्याने यंत्रणांचे हात बांधले गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन निकालांनी केंद्रीय सरकारच्या प्रतिमेला जोराचे धक्के बसलेले आहेत. त्यातील एक मुद्दा हा चंदीगड महापौरपदाचा होता. अत्यंत किरकोळ अशा या महापालिकेचा मोह सत्तापक्षाला इतका पडला की त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यानेच मतपत्रिकेशी छेडछाड आणि गैरप्रकार करून भाजप उमेदवाराला महापौर घोषित केले. हे सगळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह पाहिले गेले आणि त्यातून नसती बदनामी भाजपच्या पदरी पडली. निवडणूक अधिकारी अशा किरकोळ निवडणुकीत इतका गैरप्रकार करत असेल तर हे लोक येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किती गैरप्रकार करतील असा सूर यानिमित्ताने केजरीवाल यांना आळवण्याची संधी मिळाली आणि अशा संधीचे सोने करण्यात ते भाजप इतकेच माहीर असल्याने त्यांनी दिल्ली विधानसभेत त्यावर 16

Advertisement

मिनिटे भाषण करून मोठी संधी साधली. उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होत अखिलेश यादव यांनी आपला पक्ष यावेळी उत्तर प्रदेशात यश खेचून आणू शकेल असे वातावरण बनविण्यास प्रारंभ केला आहे. दुसरीकडे भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या अनेक पक्षांसोबत भाजपाने अद्यापपर्यंत कोणतीही जागा वाटपाची योजना जाहीर केली नाही. याबाबतीतही भाजप धक्कातंत्र अवलंबेल अशी स्थिती असून त्याचा धसका घेतलेले मित्रपक्ष आता होणारया परिस्थितीत होकार दर्शविण्यापलीकडे काहीही करू शकणार नाहीत. कारण भाजपला केंद्रात सत्ता आणण्यासाठी मोठे कौशल्य वापरायचे आहे. त्यासाठी आमचीच सगळी यंत्रणा राबणार असेल तर निर्णयही आमच्या सांगण्याप्रमाणे झाले पाहिजेत ही भाजपची भूमिका असेल. काही वेळा मित्रपक्षाला आपलाच उमेदवार देऊन त्यांची मर्जी राखण्याचे कामही होईल. मात्र सर्वत्र मित्र पक्षांचे ऐकून घेण्याच्या स्थितीत भाजप नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या युक्त्या करून मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याची तयारी करत आहे. त्यासाठी राम मंदिर उभारणी, पूजेसाठी जमिनीवर झोपण्यापासून कठोर व्रत करण्यापर्यंत आणि भारतरत्न पुरस्कार ते समुद्राच्या तळाशी उतरून कृष्ण नगरीचे दर्शन घेण्यापर्यंत सर्व प्रकारचे दिव्य त्यांनी करून दाखवलेले आहे. त्यामुळे मोदी यांच्या भोवतीच येणारी निवडणूक फिरवण्याची तयारी सत्तापक्ष करत आहे. पण विरोधकांची आघाडी ही विस्कळीत झालेली आघाडी आहे असे म्हणणाऱ्या सत्ता पक्षाला उत्तर भारत, मध्य प्रदेश येथे झालेली समाजवादी बरोबरची काँग्रेस आघाडी, बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस आघाडी, आप बरोबरची अनेक राज्यातील आघाडी, महाराष्ट्रात काही मतदार संघ वगळता महाविकास आघाडीची पूर्ण होत आलेली जागावाटपाची चर्चा, दक्षिण भारतातील सत्ताधारी पक्षांशी असलेली चांगली स्थिती आणि दोन राज्यात स्वत:चे सरकार या जोरावर काँग्रेस आणि इंडिया आघाडी तुटून पुन्हा जुळवण्याच्या तयारीला लागले आहेत. अजूनही निवडणूक जाहीर होऊन प्रत्यक्ष प्रचारापर्यंत पंतप्रधान कोणती खेळी करतात हेही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे विखुरलेली आघाडी एकवटली तरी अंतिम निकाल काय येणार याची उत्सुकता कायम राहणार आहे कारण सत्तेच्या भात्यातही अधिक तगडे बाण आहेत. त्याच जोरावर तेही चारशे पार चा नारा देत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.