गोवा बागायतदार संस्थेवर पुन्हा सावईकर!
अॅड.नरेंद्र सावईकर गटाचे निर्विवाद वर्चस्व : सावईकर यांची सलग पाचव्यांदा निवड,फोंड्यातील सर्वच्या सर्व सहा जागा जिंकल्या ,नवीन चेहऱ्यांना संधी,19 पैकी 10 नवीन चेहरे
फोंडा : गोवा बागायतदार सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने दणदणीत विजय मिळवीत वर्चस्व राखले आहे. एकूण 19 जागांपैकी 7 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले असून खुल्या गटातील 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले. फोंडा तालुक्यातील सर्वच्या सर्व 6 जागा सावईकर गटाने जिंकल्या असून महिलांसाठी आरक्षित असलेल्या एका जागेवरही त्यांच्याच गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत.
दि. 20 रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल मंगळवार दि. 22 रोजी कुर्टी फोंडा येथील सहकारभवनमध्ये होऊन दुपारी निकाल जाहीर करण्यात आला. सत्तरी तालुक्यातील 3 आणि काणकोण तालुक्यातील एका जागेवर सर्व उमेदवारांची तसेच दोन महिला व एका अनुसूचित राखीव जागा मिळून 7 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 19 पैकी खुल्या गटातील 12 जागांसाठी मतदान घेण्यात आले. फोंडा तालुक्यातून खुल्या गटातील 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासह पंढरीनाथ श्रीपाद चाफाडकर, हेमंत दुर्गाराम कथने, विकास विश्वनाथ प्रभू, समीर देविदास सामंत व महेश साजू शिलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
याशिवाय फोंड्यातून महिलांसाठी आरक्षित असलेल्या एका जागेवर नूतन सतीश गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. फोंड्यातील 6 जागांसाठी 9 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये माजी संचालक हेमंत प्रभाकर सामंत, बाळ आत्माराम सहकारी, सुरेश शाबा केरकर हे अन्य उमेदवार रिंगणात होते. अॅड. नरेंद्र सावईकर यांना सर्वाधिक 961 मते मिळाली आहेत. फोंडा तालुक्यातून 4459 मतदारांपैकी 1327 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. नरेंद्र सावईकर हे सलग पाचव्यावेळी गोवा बागायतदारवर निवडून आले आहेत.
सांगे, केपे, सालसेत, मुरगाव व धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश असलेल्या सांगे तालुका विभागातून जितेंद्र आनंद पाटील, पांडुरंग शांताराम पाटील व रमेश घनश्याम प्रभू दाभोलकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. या तालुक्यात पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जयेश अशोक पाटील व यशवंत भगवंत तेंडुलकर हे अन्य उमेदवार रिंगणात होते. डिचोली, तिसवाडी, बार्देश व पेडणे या चार तालुक्यांचा समावेश असलेल्या डिचोली तालुका विभागातून व्यंकटेश उर्फ गौतम गुरुदास मोने, रोहन वामन सावईकर व शुभदा मोहनदास सावईकर हे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण पाच जागांसाठी या तालुक्यात झालेल्या निवडणुकीत विनायक नामदेव सामंत व विलास विष्णू सावईकर हे अन्य दोघे उमेदवार रिंगणात होते.
सत्तरी तालुक्यातून खुल्या गटातील 3 जागांवर वामन लक्ष्मण बापट, संतोष विश्वनाथ केळकर व प्रशांत प्रभाकर मराठे हे तिघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच काणकोण तालुक्यातून खुल्या गटातील एका जागेवर कमलाक्ष विश्वेश्वर टेंगसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच दक्षिण गोव्यातून महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर तनुजा नागेश सामंत यांची तसेच एसटी एससींसाठी आरक्षित जागेवर रामनाथ राघलो गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गोवा बागायतदार ही गोव्याच्या सहकार क्षेत्रातील एक सर्वात जुनी व अग्रगण्य अशी सहकारी संस्था असून यंदा या संस्थेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा बागायतदार संस्था शेतकरी व बागायतदार तसेच असंख्य ग्राहकांच्या विश्वासावर उभी आहे. ज्या विश्वासाने बागायतदार सभासदाने नवीन संचालकांना निवडून दिले आहे, तो विश्वास जपतानाच येणाऱ्या काळात संस्थेची अधिकाधिक प्रगती साधण्याची जबाबदारी नूतन संचालक मंडळावर असेल असे अॅड. नरेंद्र सावईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. निवडणूक प्रक्रिया अत्यंत कुशलतेने हाताळल्याबद्दल साहाय्यक निवडणूक अधिकारी राजू मगदूम, निर्वाचन अधिकारी प्रसन्न शेटकर व सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
19 पैकी 10 उमेदवार नवीन चेहरे
गोवा बागायतदारच्या 19 संचालक मंडळावर निवडून आलेल्या नूतन सतीश गावडे, तनुजा नागेश सामंत व शुभदा मोहनदास सावईकर या तिनही महिला पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. फोंडा तालुक्यातून विजयी झालेले विकास विश्वनाथ प्रभू, समीर देविदास सामंत तसेच डिचोली तालुक्यातील व्यंकटेश उर्फ गौतम गुरुदास मोने व रोहन वामन सावईकर तसेच सत्तरी तालुक्यातून बिनविरोध निवडून आलेले प्रशांत प्रभाकर मराठे, वामन लक्ष्मण बापट व अनुसूचित राखीव जागेवर बिनविरोध निवडून आलेले रामनाथ राघलो गावडे हे सर्व उमेदवार नवीन चेहरे आहेत.