सौराष्ट्रचा केवळ एका धावेने विजय
वृत्तसंस्था / अहमदाबाद
सय्यद मुश्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इलाईट ड गटातील झालेल्या चुरशीच्या सामन्यात सौराष्ट्रने कर्नाटकाचा केवळ एका धावेने पराभव केला. या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्रने हा विजय पटकाविला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने 20 षटकांत 8 बाद 178 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाने 20 षटकांत 9 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली. सौराष्ट्रच्या डावात व्ही. जेडजाने 40 तर सिद्धांत राणाने 42 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या विशाखने 28 धावांत 3 गडी बाद केले. कर्नाटकाच्या डावामध्ये देवदत्त पडिकलने 66 धावांचे योगदान दिले. सौराष्ट्रच्या चेतन साकारियाने 37 धावांत 2 बळी मिळविले.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात झारखंडने तामिळनाडूचा 28 धावांनी पराभव केला. या सामन्यात झारखंडने 20 षटकांत 3 बाद 207 धावा जमविल्या. कुमार कुशाग्रहने 84 तर विराट सिंगने 72 धावा झोडपल्या. त्यानंतर तामिळनाढूने 20 षटकांत 7 बाद 179 धावा जमविल्या. साईसुदर्शने 64 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक: सौराष्ट्र 20 षटकांत 8 बाद 178, कर्नाटक 20 षटकांत 9 बाद 177, झारखंड 20 षटकांत 3 बाद 207, तामिळनाडू 20 षटकांत 7 बाद 179