सौराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, आंध्र विजयी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2024 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या सय्यद मुस्ताकअली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्रने बडोदा संघाविरुद्ध 20 षटकात 6 बाद 266 अशी सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. ब गटातील या सामन्यात सौराष्ट्रने बडोदा संघाचा 78 धावांनी पराभव केला. दुसऱ्या एका सामन्यात कर्नाटकाने तामिळनाडूवर विजय नोंदविला. पंजाबने हैद्राबादवर मात केली. तसेच आंध्रने सेनादलचा पराभव केला.
सौराष्ट्र आणि बडोदा यांच्यातील ब गटातील सामन्यात सौराष्ट्रतर्फे हार्विक देसाईने 39 चेंडूत जलद 76 धावा झोडपल्या. सलामीच्या गोयलने 15 चेंडूत 40 धावा झोडपल्या. गोहीलने 18 चेंडूत 53 धावा जमविल्या. सौराष्ट्रने 20 षटकात 6 बाद 266 धावा जमवित बडोदा संघाला 267 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर बडोदा संघाने 20 षटकात 8 बाद 188 धावांपर्यंत मजल मारली. बडोदा संघ ब गटात गुणवारीत आघाडीवर असून सौराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील सामने कर्नाटक संघातील वेगवान गोलंदाज वासुकी कौशिकने भेदक गोलंदाजी करत पहिल्या दोन षटकात त्याने तीन गडी बाद केल्याने तामिळनाडूची स्थिती 4 बाद 7 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर तामिळनाडूचा डाव 90 धावांत आटोपला. कर्नाटकाने 11.3 षटकात विजयाचे उद्दिष्ठ गाठले. मनीष पांडेने नाबाद 42 धावा जमविल्या. या सामन्यातील विजयामुळे कर्नाटकाने आपली स्थिती अधिक मजबूत केली तर तामिळनाडूचे आव्हान संपुष्टात आले आहे.
या स्पर्धेत अन्य एका सामन्यात पंजाबने हैद्राबादचा केवळ 7 धावांनी पराभव करत बाद फेरीसाठीचे आपले आव्हान थोडे जिवंत ठेवले आहे. पंजाबने 20 षटकात 6 बाद 196 धावा जमविल्या. अनमोलप्रितसिंगने 60 तर रमनदीप सिंगने 11 चेंडूत नाबाद 39 धावा झोडपल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली हैद्राबाद संघाला हे उद्दिष्ठ गाठता आले नाही. मिलिंदने 22 चेंडूत 55 धावा केल्या. पंजाबतर्फे धीरने 5 गडी बाद करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
आंध्र आणि सेनादल यांच्यातील सामन्यात आंध्रने सेनादलाचा 23 धावांनी पराभव करत बाद फेरीतील आपले स्थान मजबूत केले आहे. अद्याप आंध्रचे केरळ आणि मुंबई विरुद्धचे सामने बाकी आहेत. आंध्रने 20 षटकात 8 बाद 222 धावा जमविल्या. भरतने 39 चेंडूत 63 तर भुईने 35 चेंडूत 5 षटकारांसह 84 धावा झळकविल्या. त्यानंतर सेनादलातर्फे मोहीत अहलावतने 37 चेंडूत 74 धावांची खेळी केली. पण सेनादलाचा डाव 199 धावांवर आटोपल्याने आंध्रने हा सामना जिंकला.