महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानाला जमिनीवर आणणारा सौरभ ‘गोंयकार’!

11:47 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सौरभचे नाव आता सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मुखावर : अमेरिकेच्या विजयात मोलाचा वाटा

Advertisement

मडगाव : अमेरिका आणि वेस्ट इंडिजने संयुक्तपणे आयोजित केलेल्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील लीग लढतीत पाकिस्तानला यजमान अमेरिकेच्या नवख्या संघाने चारीमुंड्या चीत केले आणि विश्व क्रिकेटच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये एक सनसनाटी विजयाची नोंद केली. या विजयाचा शिल्पकार ठरला तो त्यांचा जलदगती गोलंदाज मूळ गोंयकार सौरभ नेत्रावळकर मूळ गोव्यातील ताळगाव येथील कुटुंब असलेल्या 32 वर्षीय सौरभ नरेश सिनाय नेत्रावळकरने पाकिस्तानविरूद्धचा सामना ‘टाय’ झाल्यानंतर ‘सुपर ओवर’मध्ये अचूक गोलंदाजी करून आपल्या संघाने केलेल्या 19 धावा यशस्वीपणे ‘डिफेंड’ केल्या आणि एका रात्रीतच गोव्याचा हा सुपूत्र भारतीय क्रिकेटप्रेमींच्याच नव्हे, तर क्रिकेट विश्वात परिचित झाला. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात जमिनीवर लोटांगण घालायला लावणाऱ्या गोव्याच्या सौरभ सिनाय नेत्रावळकरचे नाव आता सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मुखावर राहिले आहे.

Advertisement

गोवा, भारताचा नावलौकिक 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत म्हणजे क्रिकेट जगतातील क्रिकेटप्रेमींना एक पर्वर्णीच. आता सलामीचा सामना आरामात जिंकलेल्या भारताचा सामना 9 जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकेने तर पाकिस्तानला त्यांच्या पहिल्याच लीग सामन्यात पराभूत करून सर्वांनाच थक्क केले आहे. या लाजिरवाण्या पराभवाचे शल्य भारताविरूद्धच्या लढतीतही पाकिस्तानला असणार आहे. पाकिस्तानला जमिनीवर आणणाऱ्या गोव्याच्या सौरभने अमेरिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलून केवळ आपलं नावचं नव्हे तर तमाम गोवेकर, भारतीयांचे आणि प्रतिनिधीत्व करणाऱ्या अमेरिकेचे नाव  क्रिकेट जगतात अजरामर केले आहे.

पणजोबा, आजोबांनी गाठली मुंबई

सौरभचे पणजोबा पुरुषोत्तम सिनाय नेत्रावळकर आणि आजोबा श्रीपाद सिनाय नेत्रावळकर हे ताळगावचे. मंगेश कुलदैवत असलेल्या सिनाय नेत्रावळकरचे पूर्वजांचे घर तसेच अजुनही त्यांचे कुटुंब ताळगावात आहे. 1941 च्या सुमारास कामासाठी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.

सौरभ शिक्षणासाठी गेला अमेरिकेत

मालाड येथे राहणारा नरेश नेत्रावळकरचा पुत्र सौरभ हा संगणक अभियंता असून त्याने आपले मास्टर्समधील पुढील शिक्षण अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठमध्ये पूर्ण केले. सौरभची आई सुमन ही गोव्यातील कुंभारजुवेतील लवंदे घराण्यातली. सध्या ती तसेच सौरभची पत्नी अमेरिकेत सौरभची कमाल पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.

धोनी, विराट यांच्याबरोबरही खेळला  

डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सौरभला बीसीसीआयच्या कॉर्पोरेट स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळाली. युवराज सिंग, सुरेश रैना तसेच रॉबीन उथप्पा यांच्यासमवेतही त्याने ड्रेसिंग रुम शेअर केली. 18 वर्षांचा असताना तो महेंद्र सिंग धोनी तसेच विराट कोहली यांच्याविरूद्धही खेळला. विविध स्पर्धांत केलेल्या कामगिरीच्या बळावर गोव्याच्या सौरभची भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली.

चौदा वर्षांनंतर काढला वचपा

19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात खेळलेल्या सौरभने आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेट मुंबई संघातून 2013 मध्ये फक्त एकच रणजी सामना खेळला आहे. 2010 मध्ये सौरभने 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरूद्धच्या लढतीत खेळला व या उपान्त्यपूर्व सामन्यात भारताला दोन विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. 14 वर्षांनंतर सौरभने याचा वचपा अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करताना काढला आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळविला.

‘अॅप’ विकसित केल्याने मिळाली शिष्यवृत्ती 

रणजीत पदार्पण केल्यानंतर सौरभने पुण्यात मिळालेली एका भरगच्च पगारी नोकरी केवळ क्रिकेट खेळण्यासाठी नाकारली. मात्र मुंबई रणजी संघात संधी न मिळाल्याने त्याने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कॉर्नेल विद्यापीठाकडून मिळालेली शिष्यवृत्ती स्वीकारली. क्रिकेट आणि इंजिनियरिंग या दोन्हीत रूची असलेल्या सौरभ  नेत्रावळकरने ‘क्रिकडिकोड’ या नावाची एक ऐप विकसित केली होती, ज्यामुळे सौरभला ही शिष्यवृत्ती मिळाली. अमेरिकेत गेल्यानंतरही आपली क्रिकेट चालू ठेवलेल्या सौरभ नेत्रावळकरने 2016 मध्ये यूएसएसीए राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत नॉर्थ-वेस्टचे प्रतिनिधीत्व केले. 2017 मध्ये सदर्न कॅलिफॉर्निया क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधीत्व करताना यूएसए इलेव्हन संघाविरूद्ध त्याने एक शानदार स्पेल टाकली, यामुळे तत्कालिन अमेरिका क्रिकेट संघाचे श्रीलंकन प्रशिक्षक पबुदू दासानायके प्रभावित झाले आणि त्यांनी सौरभला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान दिले. अमेरिकेसाठी पदार्पण करताना त्याने लीवर्ड आयसलेंड विरूद्ध 45 धावात 2 गडी बाद करून आपली निवड सार्थ  ठरविली.

सध्या सौरभकडे अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटचा करार आहे. गेल्या वर्षी वॉशिंगटन फ्रिडम संघाचे प्रतिनिधीत्व करताना मॅथ्यू वेंड, मार्कुस स्टोयनिस व शादाब खान यांचा समावेश असलेल्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सविरूद्ध सौरभने आपल्या वेगवान गोलंदाजीची कमाल दाखविताना केवळ 9 धावात 6 गडी बाद केले होते.

भारताविरुद्ध खेळणार आता सौरभ  

मोहम्मद रिजवान आणि इफ्तिकार अहमदच्या घेतलेल्या विकेट्स तसेच ‘सुपर ओवर’मध्ये परत एकदा इफ्तिकार अहमदची घेतलेली महत्वपूर्ण विकेट गोव्याच्या या सुपूत्राला एक नवीन ओळख मिळवून देणारी ठरली. आता 12 जून रोजी नासांव काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा तिसरा लीग सामना अमेरिकेशी होणार आहे. या लढतीत गोव्याचा सुपूत्र सौरभ नेत्रावळकर आता भारताचा प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने या लढतीकडे प्रामुख्याने तमाम गोवेकरांचे लक्ष असेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article