थोडक्यात वाचली सौदीची रिफायनरी
काश्मीरमध्ये खामेनेई मृत्यूविरोधात निदर्शने चालूच
वृत्तसंस्था/ तेल अवीव, तेहरान
अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर आता इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या सर्व मित्र राष्ट्रांनाही युद्धात ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे. इराणने सोमवारी सौदी अरेबियाचे सर्वात मोठे तेलशुद्धीकरण केंद्र (रिफायनरी) उडविण्याचा प्रयत्न केला आहे. रास तनुरा नामक या तेलशुद्धीकरण केंद्रावर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तथापि, त्यांच्यापैकी बहुतेकांचा नेम चुकल्यामुळे या केंद्राची मोठी हानी झाली नाही. तथापि, दक्षतेची उपाययोजना म्हणून हे केंद्र काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सौदी अरोबियाने घेतला.
अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्यात इराणचे सर्वात प्रमुख शिया धर्मगुरु आणि प्रमुख राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याने जगभरात अमेरिका आणि इस्रायलविरोधात निदर्शने केली जात आहेत. भारतात काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही निदर्शने करण्यात येत आहेत. श्रीनगरच्या लाल चौकात अनेक निदर्शकांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणा दिल्या. नंतर पोलिसांकडून त्यांना पांगविण्यात आले. काही स्थानी सौम्य लाठीमार झाल्याचे अनधिकृत वृत्त आहे. पाकिस्तानात काही स्थानी शिया समुदायाने निदर्शने केली.
तुर्कस्थानातील तळांवर हल्ला
इराणने सोमवारी तुर्कस्थानातील अमेरिकेच्या तळांवरही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला चढविला. इराणची क्षेपणास्त्रे तुर्कस्थानपर्यंत पोहचल्याने मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने आतापर्यंत बहारिन, कतार, कुवेत, जेद्दाह, अबुधाबी, दुबई आदी देशांवर जोरदार हल्ले केलेले आहेत.
इराणच्या तीन नौकांना जलसमाधी
अमेरिकेच्या विमानांनी बाँब हल्ला केल्याने इराणच्या आखातातील इराणच्या तीन युद्धनौकांना जलसमाधी मिळाली आहे. या नौकांवरुन अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे सोडली जात होती. त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. सोमवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती अमेरिकेच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
अमेरिकेची तीन एफ-15 विमाने नष्ट
या संघर्षात अमेरिकेची तीन एफ-15 विमाने नष्ट झाली आहेत. मात्र, ती इराणच्या क्षेपणास्त्रांमुळे पडलेली नसून कुवेतच्याच क्षेपणास्त्रांनी चुकीच्या लक्ष्यावर हल्ला केल्याने पडली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. या तीनही विमानांमधील वैमानिकेंचे जीव मात्र वाचले आहेत. विमान पडत असताना त्यांनी उड्या घेतल्याने त्यांचे प्राण बचावले. अमेरिकेच्या दोन मोठ्या विमानवाहू नौका इराणच्या आखातात असून त्यांची या युद्धात सर्वाधिक सक्रीय भूमिका आहे.
इराणच्या अण्विक केंद्रांवर हल्ला?
इराणने आपल्या देशात अनेक गुप्त स्थानी भूमीखाली खोलवर आपली युरेनियम संपृक्तीकरण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांनाही अमेरिका आणि इस्रायल यांनी लक्ष केल्याचे या देशांचे प्रतिपादन आहे. त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी भूमीत खोलवर जाऊन स्फोट घडविणारे विशेष प्रकारचे बाँब्ज उपयोगात आणण्यात आले आहेत. इराणची अणुबाँब बनविण्याची क्षमता नष्ट झाल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केले होते. ते याच हल्ल्यांना अनुसरुन होते, असे बोलले जाते. तथापि, अद्याप इराणने अद्याप हे प्रतिपादन मान्य केलेले नाही.
खामेनेईंचे अनेक कुटुंबीय ठार
या संघर्षात ठार झालेले इराणचे सर्वेसर्वा आयातोल्ला अली खामेनेई यांचे अनेक कुटुंबीयही ठार झाले आहेत. त्यांची दोन मुले, तीन मुला। नातवंडे आणि सुना अशी मिळून किमान त्यांच्या कुटुंबातील 20 माणसे मारली गेली आहेत, असे वृत्त आहे. इराणने या वृत्तालाही अद्याप दुजोरा दिला नसला, तरी खामेनेई यांच्या कुटुंबातील अनेकजण ठार झाले आहेत, ही वस्तुस्थिती म्हणून मानण्यात येत आहे. त्यांच्यासह इराणच्या प्रशासनातील किमान 70 उच्चपदस्थ अधिकारी आणि सेनाधिकारी या संघर्षात आतापर्यंत मारले गेले आहेत, अशी माहिती दिली गेली.
आतापर्यंत 1 हजारांहून अधिक ठार
गेल्या तीन दिवसांमध्ये या संघर्षात इराणचे 1 हजार नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. काही संस्थांच्या माहितीनुसार हा आकडा 3 हजार पर्यंत असू शकतो. मात्र, अद्याप अमेरिका किंवा इराण या दोन्ही देशांना मृतांच्या संख्येची अधिकृत घोषणा केलेली नाही. इराणमधील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची मात्र पुष्टी करण्यात येत आहे.
रखडली चर्चा प्रक्रिया
या युद्धामुळे चर्चा प्रक्रिया रखडली आहे. गेल्या शुक्रवारपर्यंत चर्चा आणि युद्धाची सज्जता या दोन्ही घडामोडी एकाच वेळी होत होत्या. तथापि, शनिवारी या संघर्षाला प्रारंभ झाला. त्यानंतर बोलणी थांबविण्यात आली आहेत. इराणचे नवे नेते चर्चेसाठी राजी आहेत, असे अध्यक्ष ट्रम्प यांचे म्हणणे आहे. तथापि, इराणच्या काही अधिकाऱ्यांनी चर्चेची शक्यता फेटाळली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया ठप्प आहे.
युद्ध केव्हा थांबणार ?
हे युद्ध केव्हा थांबणार, असा प्रश्न आता जगभरात सर्वत्र विचारण्यात येत आहे. आमची उद्दिष्ट्यो जोवर साध्य होत नाहीत, तोवर युद्ध होणार, असे अमेरिका आणि इस्रायलने स्पष्ट केले आहे. या दोन्ही देशांची दोन प्रमुख उद्दिष्ट्यो आहेत. पहिले, इराणच्या अणुकार्यक्रम नष्ट करणे किंवा किमानपक्षी तो बरीच वर्षे मागे नेणे आणि इराणला अणुबाँब निर्मिती करण्यापासून रोखणे, दुसरा उद्देश इराणमधील धर्मांध राजवट संपविणे. ही उद्दिष्ट्यो किती प्रमाणात साध्य होतील, याविषयी आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी भिन्न भिन्न मते नोंदविली आहेत. इराणचा अणुकार्यक्रम अत्यंत गुप्तपणे चालत असल्याने तो उध्वस्त करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. तसेच इराणमध्ये सत्तापरिर्वन घडवून आणण्यासाठी युद्धाप्रमाणेच तेथील जनतेचाही पुढाकार असणे आवश्यक आहे, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.
इराकचे कुर्दिस्थानमध्ये हल्ले
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील मुख्य संघर्षाने मध्यपूर्वेत आणखी काही उपसंग्रामांनाही जन्म दिला आहे. या युद्धपरिस्थितीचा उपयोग इराकडून कुर्द लोकांचे सामर्थ्य कमी करण्यासाठी केला जात आहे. सोमवारी इराकच्या लष्कराने याच देशातील कुर्दसमुदाय बहुल भागावर हल्ला केला. या भागावर काही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागण्यात आले. कुर्दिश लोकांच्या बंकर्सवर आणि आस्थापनांवर हल्ले करण्यात आले. तथापि, विशेष हानी त्यांच्यामुळे झालेली नाही, अशी माहिती आहे.
खामेनेई यांचे कुटुंबीयही ठार
ड इराणचे दिवंगत नेते आयातोल्ला खामेनेई यांचे किमान 20 कुटुंबीय ठार
ड इराणच्या प्रशासनातील आणि लष्करातील अनेक अधिकारीही झालेत ठार
ड इराणच्या किमान 30 प्रांतांमध्ये अमेरिका-इस्रायल यांच्या हल्ल्यांचा प्रभाव