स्मृती इराणींनी रचला सौदीत इतिहास !
मदीनेच्या अल नबवी मशिदीला भेट देणाऱ्या ठरल्या प्रथम बिगरमुस्लीम नेत्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सौदी अरेबियात इतिहास निर्माण केला आहे. या देशातल्या मदीना या शहरात असणाऱ्या ‘अल-मस्जिद-अल-नबवी’ या प्रसिद्ध मशिदीला भेट देणाऱ्या त्या प्रथम बिगरमुस्लीम नेत्या ठरल्या आहेत. मंगळवारी त्यांनी या मशिदीला भेट दिली. त्यांच्यासह भारताचे बिगरमुस्लीम शिष्टमंडळानेही या मशिदीला भेट दिली. सहसा येथे बिगर मुस्लीमांना अनुमती दिली जात नाही.
स्मृती इराणी सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. भारतातून हाज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था कशा प्रकारे केली जात आहे, याची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. हाजच्या यात्रेला गेलेले भाविक मक्का आणि मदीना या दोन्ही शहरांचा दौरा करतात. या दोन्ही शहरांमध्ये बिगरमुस्लीमांना प्रवेश दिला जात नाही. सौदी अरेबियाचा तसा कायदा आहे. तथापि, स्मृती इराणी आणि त्यांच्यासमवेत असलेले शिष्टमंडळ यांचा या कायद्याला अपवाद करण्यात आला होता, असे वृत्त आहे. स्मृती इराणी यांनी ‘एक्स’ या सोशल मिडीया मंचावर आपल्या या ऐतिहासिक दौऱ्याची माहिती सर्वांना दिली आहे.
भारताच्या कूटनितीला यश
स्मृती इराणी आणि भारतीय शिष्टमंडळ यांना या शहराचा, तसेच तेथील प्रसिद्ध इस्लामी स्थळांचा दौरा करण्याची अनुमती दिली जाणे, हे भारताच्या कूटनितीचे यश मानले जात आहे. भारताने विशेषत्वाने गेल्या 10 वर्षांमध्ये सौदी अरेबियाशी जवळचे संबंध स्थापित केले आहेत. त्यामुळे आपल्या अतिशय कठोर नियमांमध्ये परिवर्तन करुन ही अनुमती देण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे.
शिष्टमंडळात कोण
स्मृती इराणी या भारताच्या महिला आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री आहेत. त्यांच्यासह विदेश व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधर होते. याशिवाय भारताच्या संस्कृती आणि विदेश व्यवहार विभागांचे अनेक ज्येष्ठ अधिकारीही या शिष्टमंडळात होते. या सर्वांना या शहरात येण्याची आणि तेथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची अनुमती सौदी अरेबिया सरकारने दिली होती.
महत्वाचे शहर
मदीना हे जगभरातील मुस्लीमांसाठी महत्वाचे शहर आहे. इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे मक्केहून मदिनेला गेले होते. इस्लाम धर्माची स्थापना प्रथम मक्केमध्ये झाली होती. पैगंबर मदिनेला गेल्यानंतर तेथेही त्यांनी इस्लामचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यामुळे या शहराचे मुस्लीम समाजात महत्व आहे.
मशिदीचे महत्व
इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची मशिद म्हणून ‘अल-मस्जिद-अल-नबवी’ ओळखली जाते. त्याचप्रमाणे उहूदचा पहाड आणि इस्लाम धर्माची पहिली मशिद म्हणून प्रसिद्ध असलेली कुबा आदी इतिहासप्रसिद्ध स्थळे या शहरात आहेत. या स्थळांना स्मृती इराणी आणि शिष्टमंडळाने भेट दिली असून इस्लामचा प्रारंभीचा इतिहास समजून घेण्याची संधी मिळाली, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिजाब केला नव्हता धारण
मदीना या शहराला भेट देताना स्मृती इराणी यांनी मुस्लीम महिलांचा पारंपरिक हिजाब धारण केला नव्हता, अशी माहिती देण्यात आली आहे. तरीही त्यांना इस्लामच्या दृष्टीने अतिपवित्र शहरात प्रवेश देण्यात आला, ही बाब विशेष मानली जात आहे. भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांमधील वाढत्या जवळीकीचाच हा परिणाम आहे, हे यावरुन स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांच्या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
भारतीय शिष्टमंडळाची ऐतिहासिक भेट
ड स्मृती इराणी आणि त्यांचे शिष्टमंडळ यांना अनुमती ही महत्वाची घटना
ड भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढत्या संबंधांचे हे आहे प्रतीक
ड मदीना आणि तेथील धार्मिक स्थळे जगभरातील मुस्लीमांसाठी अतिपवित्र
ड सहसा येथे बिगरमुस्लीमांना अनुमती नाही, पण भारताचा केला अपवाद