For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदी, युएई, जॉर्डन आणणार पाइपलाइन

06:26 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदी  युएई  जॉर्डन आणणार पाइपलाइन
Advertisement

होर्मुझ सामुद्रधुनीचे टेन्शन कायमस्वरुपी दूर करणार : अदानी कंपनीला होणार लाभ

Advertisement

होर्मुझ सामुद्रधुनीला बायपास करत अरब देश आता इस्रायलच्या हायफा शहरातून कच्चे तेल निर्यात करण्यावर विचार करत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी यासंबंधीचा प्रस्ताव अरब देशांसमोर मांडला हाता. आखाती देश स्वत:च्या तेल पाइपलाइन नेटवर्कद्वारे होर्मुझ सामुद्रधुनीला बायपास करण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत आहेत. याचा उद्देश तेल निर्यातसाठी पर्शियन उपसागराच्या या महत्त्वपूर्ण जलमार्गावरील निर्भरता संपुष्टात आणणे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाइपलाइन नेटवर्कसाठी हायफा बंदराची निवड करण्यात येणार असून याचा मुख्य संचालक भारतीय कंपनी अदानी समूह आहे. अदानी समुहाने एका कंसोर्टियमच्या माध्यमातून तेथील हिस्सेदारी विकत घेतली आहे. या कंसोर्टियमध्ये अदानी समुहाची 70 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 30 टक्के हिस्सेदारी इस्रायलची स्थानिक कंपनी गॅडोटकडे आहे.  अदानी-गॅडोट समुहाकडे या बंदराला 2054 पर्यंत संचालित करण्याचा परवाना आहे. हे इस्रायलचे दुसरे सर्वात मोठे बंदर असून देशातील जवळपास निम्मे कंटेनर कार्गो हाताळते. हे क्रूज जहाजांसाठी देखील इस्रायलचे मुख्य टर्मिनल आहे.

Advertisement

हायफा बंदराद्वारे तेलविक्री

हायफा बंदराच्या मार्गे अरब उपखंडाला भूमध्य समुद्राशी जोडण्याच्या पर्यायावर विचार केला जातोय. युद्धादरम्यान तेल निर्यातीचा निरंतर प्रवाह कायम राखण्यात आखाती देशांमध्ये केवळ सौदी अरेबियाला यश मिळाले आहे. याचे मुख्य श्रेय ‘ईस्ट-वेस्ट पाइपलाइन’ला जाते, जी सौदी अरेबियाच्या तेलक्षेत्रांना लाल सागरातील यानबू बंदराशी जोडते आणि होर्मुझ सामुद्रधुनीला बायपास करते. पाइपलाइन, रेल्वे, रस्त्यांचे नवे जाळे तयार करत होर्मुझ सामुद्रधुनीवरील निर्भरता संपुष्टात आणण्याची योजना आहे. लेबनॉनची कंस्ट्रक्शन कंपनी ‘कॅट ग्रूप’चे कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफर बुश हे सौदीच्या ईस्ट-वेस्ट पाइपलाइनच्या मुख्य निर्मात्यांपैकी एक होते, त्यांनी विविध पाइपलाइन्सविषयी विचारणा करण्यात आल्याची पुष्टी दिली आहे.

भारत-सौदी-इस्रायल प्रकल्प

अहवालात ज्या मुख्य प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला आहे, तो अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आयएमईसी असून तो रस्ते, रेल्वे, पाइपलाइन्सच्या जाळ्याद्वारे भारताला भूमय समुद्राशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी मुख्य आव्हान हायफा बंदराला या मार्गाचा हिस्सा करण्यासाठी सौदी अरेबियाची सहमती मिळविणे असेल. भूमध्य समुद्रापर्यंत पाइपलाइन्स आवश्यक आहेत, जेणेकरून अरब देशांना स्वत:च्या मित्रांसोबत मिळून स्वत:चे भविष्य निश्चित करता येईल असे उद्गार  इस्रायली कंपनी न्यूमेड एनर्जीचे सीईओ योसी अबू यांनी काढले आहेत. पूर्ण क्षेत्रात तेल पाइपलाइन्स आणि रेल्वे संपर्कव्यवस्था हवी, जेणेकरून कुणी अडथळे निर्माण करत आमचा गळा पकडू शकणार नाही असे अबू यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.