सौदी अरेबियाकडून हाज संख्येत कपात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सौदी अरेबियाच्या प्रशासनाने यंदा हाजच्या यात्रेसाठी भारतीय मुस्लिमांच्या संख्येत मोठी कपात केली आहे. भारतीय मुस्लिमांच्या संख्येची मर्यादा 52 हजारने कमी करण्यात आली आहे. ही कपात रद्द करावी, अशी मागणी सौदी अरेबियाकडे करावी, अशा आग्रह भारतातील काही विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला केला आहे.
हाजच्या यात्रेसाठी सौदी अरेबियाकडून दरवर्षी प्रत्येक देशातील मुस्लिमांसाठी ठराविक संख्येचे प्रमाण निर्धारित केले जाते. यावर्षी भारतातून जाणाऱ्या मुस्लिमांच्या संख्येत 52 हजारांची कपात करण्यात आली आहे. भारतातील बऱ्याच कमी मुस्लिमांना हाज यात्रेची संधी मिळणार आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी सोमवारी केली.
अनेकांना फटका बसणार
अनेक मुस्लिमांनी या यात्रेसाठी शुल्क भरलेले आहे. आता भारतीयांचे संख्याप्रमाण कमी केल्याने त्यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे भारत सरकारने त्यांना दिलासा देण्यासाठी सौदी सरकारकडे आग्रह धरावा, अशी मागणी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही केली आहे. अन्य काही पक्षांनी अशीच मागणी केली आहे. सौदी सरकारने यावर काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.