हज यात्रेपूर्वी सौदीकडून व्हिसावर निर्बंध
भारतासह 14 देशांचे व्हिसा बंद, नियम मोडल्यास 5 वर्षांची प्रवेशबंदी
वृत्तसंस्था/ रियाध
जून महिन्यात होणाऱ्या हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसह 14 देशांसाठी उमराह, व्यापार-व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी जून 2025 च्या मध्यापर्यंत कायम राहणार असून हज यात्रेच्या समाप्तीनंतर संपेल. हज यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि नोंदणीशिवाय यात्रा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
यावर्षी हज यात्रा 4 जून ते 9 जून दरम्यान असेल. या काळात यात्रेकरूंना नवीन नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केले तर त्याच्या सौदी अरेबियातील प्रवेशावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते. सद्यस्थितीत उमराह व्हिसा असलेले लोक 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात पोहोचू शकतात.
सौदी अरेबियामध्ये हजसाठी एक कोटा प्रणाली लागू आहे. याअंतर्गत प्रत्येक देशातील ठराविक संख्येतील हज यात्रेकरूंना प्रवास करण्याची परवानगी आहे. इंडोनेशियासाठी सर्वाधिक कोटा लागू आहे. यानंतर पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि नायजेरियाचा क्रमांक लागतो. इराण, तुर्की, इजिप्त, इथिओपियासह अनेक देशांमधून भाविक येतात. भारत आणि सौदीने 2025 साठी हज करारावर स्वाक्षरी केली. यामध्ये हजसाठी 1,75,025 भाविकांचा कोटा निश्चित करण्यात आला. यामध्ये 70 टक्के वाटा केंद्रीय हज समितीला आणि 30 टक्के वाटा खासगी टूर एजंटना देण्यात आला आहे.