सत्यपाल मलिक यांची प्रकृती गंभीर
दिल्लीतील लोहिया रुग्णालयात उपचार : सोशल मीडियाद्वारे संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 11 मे पासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांनी स्वत:च आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 15 दिवसांनी सत्यपाल मलिक यांनी आपले मौन सोडले. शनिवारी त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले. ‘मी गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल आहे आणि मला किडनीचा त्रास आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्यपाल मलिक यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. ‘काल सकाळपर्यंत मी ठीक होतो पण आज पुन्हा मला आयसीयूमध्ये हलवावे लागले. माझी प्रकृती खूप गंभीर होत आहे. मी जगलो किंवा नसलो तरी माझ्या देशवासियांना सत्य सांगू इच्छितो. जर आज माझ्याकडे पैसे असते तर मी स्वत: खासगी रुग्णालयात उपचार घेतले असते. ज्या प्रकरणात ते मला अडकवू इच्छितात त्या प्रकरणात मी स्वत: निविदा रद्द केली होती, हे मी स्वत: पंतप्रधानांना सांगितले होते.’ असे ट्विट मलिक यांनी केले आहे.
22 मे रोजी सीबीआयने जम्मू काश्मीरच्या किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सत्यपाल मलिकसह 5 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यात सुमारे 2,200 कोटी रुपयांच्या नागरी कामांच्या कंत्राटांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्याच प्रकरणासंदर्भात सीबीआयने 22 फेब्रुवारी 2024 रोजी सत्यपाल मलिक यांच्याशी संबंधित ठिकाणावर छापे टाकले होते. यासोबतच, दिल्लीतील इतर 29 ठिकाणीही छापे टाकण्यात आले होते.