सत्यमेव जयते ...
फलकाबद्दल मनामनांमध्ये असणारा आदर अन् महाराष्ट्रात जाण्याची इच्छा याला सरकार प्रतिबंध कसा करणार?
घटनाक्रम 24 जुलै 2014
- फलक काढण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी बैठक बोलवली
- फलक काढू नये अशी तत्कालीन आमदार संभाजी पाटील व येळ्ळूरमधील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली विनंती
- 25 जुलै -सकाळी प्रशासनाचे अधिकारी येळ्ळूरमध्ये दाखल
- सकाळी 11 .30 वा. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलकावर घाव
- याच दिवशी रात्री तालुक्यात ठिकठिकाणी ‘महाराष्ट्र राज्य’ फलक झळकले
- 26 जुलै -येळ्ळूरवासियांनी पुन्हा फलक उभारला
- 27 जुलै-पहाटे 6 वा. प्रचंड फौजफाट्यासह पोलीस येळ्ळूरमध्ये दाखल
- सकाळी 6.15 वा. पुनर्निर्मित महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवला
- सकाळी 10 ते 11 वाजता पोलिसांची मारहाण सुरू
बेळगाव : एक फलक! डोळ्यात कुसळासारखा खुपला आणि मराठी भाषिकांच्या काळजावर घाव घालत तो उतरविण्यात आला. ही घटना होती 25 जुलै 2014 ची. येळ्ळूर गावामध्ये ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक अनेक वर्षानुवर्षे मोठ्या दिमाखाने मिरवत असायचा. तथापि कोणा एका व्यक्तीच्या जनहित याचिकेवरून न्यायालयाने हा फलक बेकायदेशीर ठरवला आणि 25 जुलै 2014 रोजी हा फलक हटविण्यात आला.
केवळ फलक हटवला एवढेच त्याचे गांभीर्य नव्हते. तर या कृतीमुळे मराठी भाषिकांच्या काळजावरच घाव बसले होते. फलक काढण्याची वार्ता पसरल्याने सीमावासियांच्या मनात तगमग होती. मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयीन आदेशानुसार हा फलक काढण्यात आला. त्यावेळी तालुका पंचायतचे माजी अध्यक्ष मारुती कुगजी, ग्रा. पं. सदस्य राजू पावले व इतरांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रचंड पोलीस फौजफाट्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले आणि सकाळी 11.30 वा. फलकावर कर्नाटकी हातोडा पडला.
फलक काढल्याने समस्त येळ्ळूरवासीय शोकामध्ये बुडाले आणि सीमावासियांचा दु:खावेग अनावर झाला. कोणी संतप्त भावना व्यक्त करत होते तर काहींनी अश्रूंद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. संध्याकाळी आलेल्या तरुणांना फलकाबाबत माहिती मिळाली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जुलै रोजी ग्रामस्थांनी पुन्हा फलक उभा केला. फलक काढल्याचा निषेध म्हणून गावोगावी त्या-त्या गावच्या नावाचे फलक झळकले. अर्थातच सरकार आणि प्रशासनाच्या जिव्हारी ही बाब लागली. परिणामी रविवार दि. 27 जुलै रोजी प्रचंड फौजफाटा घेऊन पोलीस येळ्ळूरमध्ये दाखल झाले.
गावात तणावाचे वातावरण होतेच. पहाटे 6.15 वा. पुनर्निर्मित फलक हटवला. त्याचबरोबर सकाळी 7 ते 10 यावेळेत राजहंसगड, देसूर येथील फलक हटविण्यात आले. सकाळी 10 वा. पोलिसांनी अक्षरश: घराघरात घुसून अमानुष मारबडव केली. लाथा घातल्या, काठ्या उगारल्या. सकाळी 11 वा. येळ्ळूरच्या महिला रस्त्यावर उतरल्या आणि 11.15 वा. पोलिसांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. येळळ्tरला पोलीस छावणीचे स्वरूप आले.
पोलिसांच्या या अमानवी कृत्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्र, कर्नाटक बससेवेवर परिणाम झाला. या घटनेची माहिती घेण्यासाठी नियुक्त झालेले विशेष अधिकारी हेमंत निंबाळकर येळ्ळूरमध्ये दाखल झाले. पोलीस प्रशासनाने गावच्या वेशीवर बॅरिकेड्स लावून प्रवेशबंदी केली होती. हेमंत निंबाळकर यांनी बॅरिकेड्स हटविण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रवेशबंदीचे निर्बंध हटले. मात्र या घटनेने संपूर्ण सीमाभाग ढवळून निघाला. सीमावासियांनी या अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध केला. दरम्यान फलक उभारण्याचा गुन्हा केल्याच्या कारणामुळे सरकारने येळ्ळूरमध्ये अनेक जणांवर खटले दाखल केले होते.
फलक हटविला तरी सरकारने खटले भरल्याने नोटिसा, वॉरंट, सततच्या तारखा, न्यायालयात हेलपाटे याला येळ्ळूरवासीय मोठ्या धीरोदात्तपणे सामोरे गेले. सरकारने दगडी फलक उतरवून काळजावर घाव घातला. परंतु फलकाबद्दल मनामनांमध्ये असणारा आदर आणि महाराष्ट्रात जाण्याची इच्छा याला सरकार प्रतिबंध कसा करणार? ‘ईश्वर के घर में देर है, अंधेर नही’ असे म्हणतात. या वचनावर येळ्ळूरवासीय व सीमावासीय यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे ‘सत्यमेव जयते’ याची प्रचिती आली आहे. कदाचित धारातीर्थी पडलेला फलक
‘माझ्या आठवणींच्या खुणा
तुम्हाला पुसता येणार नाहीत
हृदयात कोरलेली मूर्ती माझी
वाळूत कोरलेल्या रेषांनाही
असेच म्हणत असेल’.