सत्या नडेलांनी मिळवले विक्रमी वेतन
847 कोटींचे घेतले वेतन
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा सत्या नडेला यांना 2025 मध्ये विक्रमी वेतन प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. सदरच्या वर्षात त्यांना 847 कोटी रुपये इतके वेतन मिळाल्याचे कळते. 2024 च्या तुलनेत पाहता त्यांच्या वेतनात 22 टक्के वृद्धी दिसली आहे. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर केलेला कंपनीला फायदेशीर ठरला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सत्या नडेला यांना 79.1 दशलक्ष डॉलर म्हणजेच 694 कोटी रुपये इतके वेतन मिळाले होते. कंपनीने त्यांच्या वेतनात यंदा झालेल्या वाढीला एआय विकासाच्या यशाला दिले आहे. मायक्रोसॉफ्टच्या एआयने उत्तम प्रगती साधली आहे. मंडळाचे म्हणणे आहे की, सत्या नडेला यांना त्यांच्या संघाने मायक्रोसॉफ्टला एआय क्षेत्रात जगात नेता बनवलं आहे. नडेला यांना बेसिक सॅलरी स्वरुपात 22 कोटी रुपये इतके वेतन मिळते. बाकीची वेतनातील हिस्सेदारी ही मायक्रोसॉफ्टच्या समभागांच्या माध्यमातून सत्या नडेला मिळते. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सीएफओ एमी हुड यांचे वेतन वाढीसह 259 कोटी रुपयांवर तर व्यावसायिक व्यवसाय प्रमुख जडसन अल्थॉन यांना 247 कोटी रुपयांचे वेतनाचे पॅकेज मिळाले आहे.
एआय आणि क्लाऊडमध्ये दबदबा
सत्या नडेला यांच्या नेतृत्वातील मायक्रोसॉफ्टने क्लाऊड कम्प्युटिंग व एआय या विभागात जबरदस्त विकास साधला आहे. कंपनीच्या अझ्युर क्लाऊड व्यवसायाने तर अॅमेझॉनसारख्या दिग्गज स्पर्धकांना टक्कर देण्याचे साहस केले आहे. यावर्षी पाहता मायक्रोसॉफ्टच्या समभागात 23 टक्के इतकी वाढ दिसली आहे.
2 कंपन्यांची खरेदी
सत्या नडेला यांनी सॉफ्टवेअर कंपनी म्हणूनच आपला व्यवसाय राखला नाही तर गिटहब व लिंक्डइन यासारख्या कंपन्यांची खरेदी केली. ज्यामुळे कंपनीचा सॉफ्टवेअर डेव्हपमेंट विभाग व प्रोफेशनल नेटवर्किंग विभाग अधिक मजबूत होऊ शकला आहे.
ओपन एआयसोबत भागीदारी
अलीकडेच मायक्रोसॉफ्टने मोठा खेळ खेळताना ओपन एआयमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 2019 मध्ये सुरुवातीला एआय स्टार्टअपमध्ये 8775 कोटी गुंतवले होते. आता पुन्हा 87,745 कोटी रुपयांची मायक्रोसॉफ्टने अतिरीक्त गुंतवणूक केली आहे.