सात्विक-चिरागचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त
इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटन : मलेशियन जोडीकडून पराभव
वृत्तसंस्था/ जकार्ता
बॅडमिंटनमधील भारताची अव्वल दुहेरीची जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांचे येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.
भारतीय जोडीने 2023 मध्ये येथील स्पर्धा जिंकली होती. पण यावेळी त्यांना मलेशियाच्या मॅन वेइ चाँग व टी काय वुन यांनी 43 मिनिटांच्या खेळात सात्विक-चिरागला 21-19, 21-16 असे हरविले. भारतीय जोडीवरील त्यांचा हा पहिलाच विजय आहे. आतापर्यंत त्यांची एकमेकांविरुद्ध गाठ पडली होती. सात्विक-चिरागच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
सात्विक-चिराग यांना या सामन्यात सुरुवातीला सर्व्हिससाठी व परतीच्या फटक्यांसाठी झगडावे लागले. मॅन व वी यांनी गेल्या महिन्यात मलेशिया मास्टर्स स्पर्धा व जानेवारीत इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. भारतीय जोडी बचाव व अचूक हालचाली करण्यात कमी पडले. त्यामुळे ते वरचेवर अवघडलेल्या स्थितीत सापडत होते. त्यांच्या चुकांचा मलेशियन जोडीने अचूक लाभ उठविला. दाने फटके त्यांनी नेटवर मारल्याने मलेशियन जोडीला 9-7 अशी आघाडी मिळाली आणि ब्रेकवेळी ही आघाडी 11-9 अशी झाली.
ब्रेकनंतर आक्रमक खेळत भारतीय जोडीने 11-11 अशी बरोबरी साधली. पण मॅन व वी यांनी लवकरच 15-12 अशी पुन्हा आघाडी घेतली. सात्विक-चिरागने त्यांना 17-17 वर पुन्हा गाठले. पण याचा त्यांना लाभ घेता आला नाही. टी ने अचूक परतीचा फटका मारत 19-17 अशी बढत घेतल्यानंतर चिरागने नेटजवळ एक गुण मिळविला. पण पुन्हा तो नेटजवळ चुकल्यानंतर मलेशियन जोडीने पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडी विस्कळीत झाल्याचे दिसले. त्यामुळे ते 3-7 असे मागे पडले. फ्लॅट ट्रॅजेक्टरी व ड्रिफ्टचा मलेशियन जोडीने लाभ उठवला आणि एका जोरदार स्मॅशवर त्यांनी 15-9 अशी आघाडी वाढवली.
13-17 असे पिछाडीवर असताना भारतीय जोडीने कडवा प्रतिकार केला आणि आक्रमक खेळामुळे त्यांनी ही आघाडी 16-18 अशी कमी केली. त्यात काही दर्जेदार फ्लॅट स्मॅशेसचा समावेश होता. 20-16 अशी स्थिती असताना नेटजवळ मॅनचा खेळ व टीने मारलेल्या कर्लिंग फटक्यावर दुसऱ्या गेमसह सामना जिंकत मलेशियन जोडीने आगेकूच केली.