For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून सात्विक-चिरागची माघार

06:51 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून सात्विक चिरागची माघार
Advertisement

आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतून सात्विक-चिरागची माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या आगामी होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतून भारताची पुरुष दुहेरीतील टॉप सिडेड जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी माघार घेतली आहे. दरम्यान सात्विकच्या खांद्याला दुखापत झाली असून तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.

Advertisement

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने 2024 च्या बॅडमिंटन हंगामात आपल्या दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन घडवित विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरुष दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थान पटकाविले आहे. दुबईमध्ये गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी पुरुष दुहेरीची अजिंक्यपद मिळवले होते. या यशामुळे भारतीय बॅडमिंटन क्षेत्राचा दर्जा निश्चितच उंचावला आहे. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये यापूर्वी म्हणजे 1965 साली दिनेश खन्नाने असा पराक्रम केला होता. त्यानंतर सात्विक आणि चिराग ही भारताची दुसरी जोडी आहे. सात्विक आणि चिराग यांनी फ्रेंच खुल्या सुपर 750 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले तसेच त्यानंतर अन्य दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उपविजेतेपद पटकाविले.

सात्विकच्या खांद्याला झालेली दुखापत पूर्ण बरी झाल्यानंतरच आम्ही पुन्हा पुरुष दुहेरीमध्ये एकत्र खेळू अशी प्रतिक्रिया चिराग शेट्टीने व्यक्त केली आहे. सात्विकची ही दुखापत लवकरच बरी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दुखापतीच्या स्थितीमध्ये सात्विकला आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत खेळवण्याचा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. आणखी काही दिवसात तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि तो पॅरीस ऑलिम्पिकसाठी जोरदार सराव सुरू करेल. सात्विक आणि चिराग यांनी पुरुष दुहेरीच्या मानांकनात सलग दहा आठवडे अग्रस्थान स्वत:कडे राखण्याचा नवा विक्रम केला आहे. या जोडीने 2022 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक, 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2023 च्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 2022 साली थॉमस चषक पहिल्यांदाच जिंकण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघामध्ये सात्विक आणि चिराग यांचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. 2023 च्या इंडोनेशिया सुपर 1000 दर्जाची तसेच कोरिया खुली बॅडमिंटन स्पर्धा सात्विक आणि चिराग यांनी जिंकली आहे. 27 एप्रिलपासून चीनमध्ये थॉमस-उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय संघात सात्विक आणि चिरागचा समावेश निश्चितच राहिल. आगामी आशियाई बॅडमिंटन स्पर्धेसाठी चिराग आणि सात्विक यांच्या गैरहजेरीत एच. एस. प्रणॉय, लक्ष्यसेन, पी. व्ही. सिंधू यांच्यावर भारतीय संघाची भिस्त राहिल.

Advertisement
Tags :

.