सात्विक-चिरागला पहिले सिंगापूर ओपन विजेतेपद
जेतेपदाचा दोन वर्षांचा दुष्काळ संपुष्टात, आजवरचे नववे अजिंक्यपद, सिंगापूर ओपन दुहेरी जिंकणारी पहिली भारतीय जोडी
सिंगापूर : जागतिक क्रमवारीत एक वेळ अव्वल राहिलेली जोडी सात्विकसाईराज रन्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी एका गेमने पिछाडीवर असताना पुनरागमन करत रविवारी येथे झालेल्या बीडब्ल्यूएफ सुपर 750 स्पर्धेच्या पुऊष दुहेरीच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद शोहिबुल फिक्री यांचा पराभव केला आणि आपले पहिले सिंगापूर ओपन विजेतेपद पटकावले.
आशियाई खेळांतील आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील विजेत्यांनी झुंजार पुनरागमन करत दोन वर्षांतील आपले पहिले विजेतेपद आणि कारकिर्दीतील नववे वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले. यासोबतच त्यांनी एक तास 13 मिनिटांत 18-21, 21-17, 21-16 अशा तणावपूर्ण विजय नोंदवताना तिसरे सुपर 750 विजेतेपदही मिळवले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या या जोडीसाठी हा विजय विशेष महत्त्वाचा होता. कारण ते सिंगापूर ओपनमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
सात्विक आणि चिराग यांनी शेवटचे विजेतेपद 2024 मध्ये थायलंड ओपनमध्ये पटकावले होते. तेव्हापासून ते चार अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचले होते, परंतु अखेरीस सिंगापूरमध्ये दुष्काळ संपवण्यापूर्वी प्रत्येक वेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या इंडोनेशियन जोडीविऊद्धच्या कामगिरीत 1-2 ने मागे असूनही भारतीय जोडी आत्मविश्वासाने अंतिम फेरीत उतरली होती, त्यांचा सदर जोडीविरुद्धचा सर्वांत अलीकडील पराभव जानेवारीमध्ये मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत झाला होता.
अटीतटीचा पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक आणि चिराग यांनी आपला जोश वाढवला आणि लांब रॅलींवर वर्चस्व गाजवून जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियन जोडीविऊद्धच्या सामन्याचे चित्र पालटले. या विजयाने भारतीय जोडीसाठी एका प्रभावी आठवड्याची सांगता झाली. यादरम्यान त्यांनी उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचे विद्यमान विश्वविजेते आणि अव्वल मानांकित किम वॉन हो आणि सेओ सेउंग जे यांना धक्का दिला.
या खडतर अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी संथ सुऊवातीनंतर सावरत हळूहळू आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवले. पहिल्या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांचा खेळ काहीसा संथ आणि विस्कळीत वाटला. असे असले, तरी हा गेम शेवटपर्यंत अत्यंत अटीतटीचा राहिला. निर्णायक क्षणी झालेल्या काही चुका त्यांना महागात पडून इंडोनेशियन जोडीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि अवघ्या 21 मिनिटांतच हा गेम आपल्या नावे केला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने अत्यंत सकारात्मक हेतूने प्रत्युत्तर दिले आणि सुऊवातीपासूनच अधिक आक्रमक पवित्रा घेतला. अखेरीस 24 मिनिटांनंतर भारतीय जोडीने हा गेम आपल्या नावे केला. जाळ्याजवळ चिरागने केलेल्या चपळ कामगिरीचा सामना बरोबरीत आणण्यात मोलाचा वाटा होता. निर्णायक गेम अत्यंत तणावपूर्ण ठरला, परंतु ज्या क्षणी सर्वोत्तम खेळाची सर्वाधिक गरज होती नेमक्या त्याच वेळी भारतीय जोडीने आपल्या खेळाचा सर्वोच्च दर्जा सादर केला. यात सात्विकने हाणलेल्या जोरदार आणि ताकदवान ‘स्मॅशेस’नी निर्णायक भूमिका बजावली.