सात्विक-चिराग उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / शेनझेन (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या चायना मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीची उपांत्यफेरी गाठली.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कची द्वितीय मानांकित जोडी किम अॅस्ट्रुप आणि अॅन्डर्स स्केरप रेसमुसेन यांचा 21-16, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. हा सामना 47 मिनिटे चालला होता. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या सात्विक साईराज आणि चिराग या जोडीची कामगिरी दर्जेदार झाली. उपात्यपूर्व फेरीच्या पहिल्या गेममध्ये या जोडीने 11-8 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी ही आघाडी 16-10 पर्यंत वाढविली. आपल्या अत्कृष्ट स्मॅश फटके आणि रॅलीजच्या जोरावर सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला. मात्र दुसरा गेम अधिक चुरशीचा झाला. डेन्मार्कच्या जोडीने शेवटपर्यंत कडवा प्रतिकार केला. या दुसऱ्या गेममधील मध्यंतरापर्यंत सात्विक आणि चिराग यांनी 11-10 अशी निसटती आघाडी मिळविली होती. शेवटी सात्विक स्मॅश फटक्यावर डेन्मार्कच्या जोडीचे आव्हान 21-19 असे संपुष्टात आणले.