सात्विक-चिराग उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / ओडेन्सी (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या 2025 सालातील डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेत पुरूष एकेरीतील भारताचे आव्हान लक्ष्य सेनच्या पराभवाने संपुष्टात आले.
पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सात्विक आणि चिराग या जोडीने इंडोनेशियाची बिगर मानांकीत जोडी मोहम्मद रियान आणि आर्दिंतो रेहमत हिदायत यांचा 21-15, 18-21, 21-16 अशा गेम्समध्ये पराभव केला. ही लढत चुरशीची झाली. सुमारे 65 मिनिटे चाललेल्या या लढतीत सात्विक आणि चिराग यांनी पहिला गेम 21-15 असा जिंकल्यानंतर इंडोनेशियाच्या जोडीने दुसरा गेम 21-18 असा जिंकून सामन्यात रंगत आणली. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या गेममध्ये सात्विक आणि चिराग यांनी आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर रियान आणि आर्दिंतो यांचे आव्हान 21-16 अशा फरकाने संपुष्टात आणत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या महिन्यात झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या हाँगकाँग खुल्या तसेच त्यानंतरच्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीने उपविजेतेपद मिळविले होते. डेन्मार्कमधील ही स्पर्धा सुपर 750 दर्जाची आहे.
पुरूष एकेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या सातव्या मानांकीत अॅलेक्स लेनियरने लक्ष्य सेनचा 44 मिनिटांच्या कालावधीत 21-9, 21-14 असा फडशा पाडत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. सेनच्या पराभवामुळे पुरूष एकेरीतील भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेत लक्ष्य सेनने डेन्मार्कच्या द्वितीय मानांकीत अॅन्टोनसेनचा पराभव केला होता. या स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या मोहीत जगलन आणि लक्षिता जगलन यांचे आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या अदनान मौलाना आणि इंडेह जमील यांनी मोहीत आणि लक्षिता यांचे 21-14, 21-11 असा फडशा पाडला.