बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधून सात्विक-चिरागची माघार
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी, सात्विकसाईराज रंकीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी आगामी बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप-2026 मधून माघार घेतली आहे. त्यांचे प्रशिक्षक टॅन हर यांनी सोमवारी या वृत्ताला दुजोरा दिला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या या जोडीच्या गैरहजेरीत पुरुष दुहेरीत हरिहरन अमसकरुणन आणि एम.आर.अर्जुन हेच एकमेव भारतीय खेळाडू स्पर्धेत सहभागी असतील.
कोरियन प्रशिक्षकाने वृत्तसंस्थेला सांगितले की, जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेली ही जोडी या स्पर्धेत सहभागी होणार नाही, कारण सात्विकसाईराज सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या स्विस ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपूर्वीही दुखापतीमुळे या जोडीने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यांच्या अनुपस्थितीत पुरुष दुहेरीत हरिहरन अमसकरुणन आणि एम.आर.अर्जुन हे भाग घेतील. महिला दुहेरीतील जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तथापि त्यांच्या माघारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.