पुढील 17 दिवस शनीचे मनोहारी दर्शन; 4 ऑक्टोबरला प्रतियुती योग
पणजी : आकाश निरीक्षक आणि खगोलप्रेमींसाठी ऑक्टोबर महिना विशेष ठरणार आहे. रविवार, 4 ऑक्टोबर रोजी शनी प्रतियुतीच्या स्थितीत येणार असून, त्यानंतर पुढील काही दिवस सायंकाळच्या आकाशात शनीचे स्पष्ट दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. शनी पृथ्वीच्या तुलनेने जवळच्या स्थितीत असल्याने या काळात तो अधिक तेजस्वी दिसणार आहे.
4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटांनंतर सूर्य आणि शनी पृथ्वीच्या विरुद्ध दिशांना असतील. सूर्य आणि शनी यांच्यामध्ये पृथ्वी येते, या स्थितीला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ (Opposition) असे म्हणतात. या काळात शनी रात्रीच्या आकाशात अधिक काळ दिसत असल्याने त्याचे निरीक्षण करण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होते.
सूर्यास्तानंतर पूर्व-दक्षिण दिशेकडे पाहता येणार
सूर्यास्तानंतर पूर्व-दक्षिण दिशेकडे पाहिल्यास शनीचा शोध घेता येईल. रात्री जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा तो आकाशात अधिक उंचावर दिसेल. रात्री सव्वानऊच्या सुमारास दक्षिण-पूर्व आकाशात किंचित कपिल किंवा सोनेरी रंगाचा तेजस्वी ठिपका दिसू शकतो. ताऱ्यांप्रमाणे शनी लुकलुकत नसल्याने त्याची ओळख पटविणे तुलनेने सोपे आहे.
गोव्यात गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे आकाश निरीक्षणात अडथळे आले होते. मात्र वातावरण स्वच्छ राहिल्यास शनीचे उघड्या डोळ्यांनीही दर्शन घेता येणार आहे.
दुर्बिणीतून कड्यांचे दर्शन
शनीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याच्या भोवती असलेली कडी. साध्या दुर्बिणीतूनही शनीचा किंचित सोनेरी रंग आणि कड्यांची रचना पाहण्याची संधी मिळू शकते. अधिक क्षमतेच्या दुर्बिणीतून शनी आणि त्याच्या कड्यांचे अधिक स्पष्ट निरीक्षण करता येईल.
खगोल अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी ही घटना ग्रहांचे निरीक्षण, त्यांच्या हालचाली आणि पृथ्वी-शनीच्या परस्पर स्थितीचा अभ्यास करण्याची चांगली संधी ठरणार आहे.
दरवर्षी बदलते प्रतियुतीची तारीख
शनीची प्रतियुती दरवर्षी घडते. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 365 दिवस लागतात, तर शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 29.5 वर्षे लागतात. पृथ्वीचा परिभ्रमण वेग अधिक असल्यामुळे ती दरवर्षी शनीला एका विशिष्ट स्थितीत मागे टाकते आणि त्यामुळे शनीची प्रतियुती साधारणपणे मागील वर्षाच्या तुलनेत काही दिवस उशिरा येते.
2024 मध्ये शनी प्रतियुती 8 सप्टेंबर रोजी झाली होती. 2025 मध्ये ती 21 सप्टेंबरला झाली, तर 2026 मध्ये 4 ऑक्टोबरला हा योग येणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2027 मध्ये शनीची प्रतियुती 18ऑक्टोबर रोजी होणार आहे.
त्यामुळे पुढील दिवसांत आकाश स्वच्छ असताना शनीचे निरीक्षण करण्याची संधी खगोलप्रेमींनी साधावी. विशेषतः दुर्बिणीच्या साहाय्याने शनीचे निरीक्षण केल्यास त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कड्यांचे दर्शन अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे.