सात्विक, राजस आणि तामस भक्त
अध्याय सातवा
निरपेक्ष, निरिच्छ भक्ताला लोककल्याणकारी कार्य करण्यासाठी बाप्पा सिद्धी प्रदान करतात, त्यामुळे त्याला विशेष शक्ती प्राप्त होतात. पुढे बाप्पा सांगतात की, एव्हढा माझ्या पूजेचा महिमा सांगूनसुद्धा, काही लोक माझी पूजा करायचे सोडून अन्य देवतांची पूजा करत असतात. वास्तविक पाहता ह्या देवता माझंच सगुण रूप असतात आणि त्या रूपात मी त्यांना नेमून दिलेलं कार्य करत असतात पण हे लक्षात न घेता काही लोक त्यांचीच पूजा करतात. खरं म्हणजे ते माझीच पूजा करत असतात. जे अन्य दैवतांची पूजा करतात ते सरळ माझी पूजा करत नसल्याने त्यांना मिळालेलं फळ कायम टिकणारं नसतं. याउलट माझी पूजा करत राहिल्यास मी भक्तांना कायम टिकेल असं फळ देतो.
बाप्पांची पूजा काही अपेक्षेने जे करतात त्या अपेक्षा त्यांच्या हिताच्या असतील तर बाप्पा त्या पूर्ण करतात. भक्त निरपेक्ष असेल तर त्याला स्वत:हून सिद्धी प्रदान करतात व त्यांना लोककल्याणकारी कार्य करायला प्रेरणा देतात. जोपर्यंत आयुर्मान आहे तोपर्यंत त्यांच्याकडून असे काम करून घेतात व शेवटी त्यांच्या लोकी स्थान देतात. असं जरी असलं तरी ज्यांना बाप्पांनी दिलेल्या वरील अश्वासनावर विश्वास वाटत नसतो ते अन्य दैवतांचे पूजन करतात. एकप्रकारे हीही बाप्पांचीच पूजा असते पण ती विधिवत नसते. तरीही बाप्पा अशा भक्तांना त्यांना हवे असलेले फळ देत असतात. अशा भक्तांना भगवद्गीतेमध्ये, सतराव्या अध्यायात सात्विक भक्त असं म्हंटलेलं आहे. अर्थात राजस आणि तामस असेही भक्तांचे प्रकार आहेतच.
सत्त्व-स्थ पूजिती देव। यक्ष-राक्षस राजस । प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस ।। 17.4 ।।
जी मंडळी बाप्पांचा व इतर देवतांचाही द्वेष करून यक्ष, राक्षस अशांची पूजा करतात त्यांना राजस स्वभावाचे असं म्हणतात. व्यवहारात भल्या बुऱ्या गोष्टी साध्य करून घेण्यासाठी ज्यांना काही तात्पुरते अधिकार प्राप्त असतात अशा मंडळींची, लोभी असलेले राजस लोक पूजा करत असतात. यक्ष, राक्षस इत्यादि मंडळींना काही काळ, काही अधिकार प्राप्त झालेले असतात. राजस मंडळी अशा यक्ष, राक्षस लोकांची पूजा करतात. त्यातून त्यांना पाहिजे ती कामे ते साधून घेतात. त्याच्याही पुढचा प्रकार म्हणजे तामस लोकांचा. तामस स्वभावाचे लोक कोणत्याच देवाची पूजा न करता त्यांचा तिरस्कार करून प्रेते आणि भुतेखेतांची पूजा करतात व जादूटोणा, मंत्र, तंत्र इत्यादींच्या माध्यमातून त्यांची मदत घेऊन दुष्कर्मे करत राहतात. काहीही करून लोकांना त्रास देणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. गुंड, मवाली, समाजकंटक अशा लोकांच्या नादाला तामसी भक्त लागतात व त्यांच्याकडून अनिष्ट कर्मे करवून घेतात किंवा स्वत: करतात. अशा राजसी आणि तामसी भक्तांवर बाप्पांची करडी नजर असते. मृत्यूनंतर बाप्पा त्यांची रवानगी अनंत काळपर्यंत नरकात करून टाकतात. ह्या अर्थाचा यो ह्यन्यदेवतां मां च द्विषन्नन्यां समर्चयेत् । याति कल्पसहस्रं स निरयान्दुऽ खभाक् सदा ।। 13।। हा श्लोक आपण पहात आहोत. कुणी म्हणतील स्वर्ग, नरक या संकल्पना खऱ्या कशावरून? तर त्याचं उत्तर असं आहे की, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत त्यांचा पुढील जन्म उत्तम परिस्थितीत होतो तर दुष्कृत्ये करत ज्यांनी आयुष्य काढलं आहे त्यांना पुढील जन्म बेताची परिस्थिती असलेल्या कुटूंबात मिळतो, त्यातील कित्येकांना कुटूंबातील पूर्वापार चालत आलेल्या परिस्थितीचा, आजारांचा सामना करावा लागतो. हे सर्व आपण पहात असतो. त्यामागची कारणे जाणून घेतल्यावर आपण स्वर्ग किंवा नरक काय असतील याची कल्पना करू शकतो!
क्रमश: