ओटीटीवर येणार ‘सतरंगी’
‘सतरंगी’ नावाची एक वेबसीरिज ओटीटीवर येत असून यात अंशुमान पुष्कर, कुमुद मिश्रा आणि महवश हे दिग्गज कलाकार असतील. या सीरिजमध्ये उत्तरप्रदेशातील एका अशा गावाची कहाणी आहे, ज्यात जातीचा वरचष्मा अद्याप आहे. परंतु कहाणीच्या केंद्रस्थानी बबलू महतोची व्यक्तिरेखा असून ती स्वत:च्या पिताच्या कामामुळे त्रस्त असते. त्याचे वडिल नाचण्याचे काम करत असतात. यामुळे होणारा अपमान आणि अन्यायाच्या विरोधात बबलू आवाज उठवितो. यातून सुरू होतो सूडाच खेळ आणि तो काळासोबत रक्तपातात बदलतो.
सतरंगी : बदले का खेल’ या सीरिजचे दिग्दर्शन जय बसंतू सिंह यांनी केले आहे. तर याची निर्मिती आरएनडी फिल्म एलएलपीने केली असून ही एक झी5 ओरिजनल सीरिज आहे. सतरंगी : बदले का खेल ही सीरिज झी5 वर 22 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून प्रथमदर्शनी उत्सुकता वाढविणारा आहे. या सीरिजमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी, तेथील बहुआयामी व्यक्तिरेखा आणि सत्तेच्या कहाणीदरम्यान नाचण्याच्या सांस्कृतिक कलेला प्रभावीपणे दर्शविण्यात आले आहे. सामाजिक संघर्षाची ही कहाणी असमानतेने भरलेल्या समाजाची झलक दाखविणारी आहे.