सतीश कुमार उपउपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ योकोहामा, जपान
भारतीय बॅडमिंटनपटू सतीश कुमार करुणाकरनने येथे सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्याने त्याला उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले.
23 वर्षीय करुणाकरनने अँटोनसेनवर 6-1 आघाडी घेतली असताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या अँटोनसेनने फक्त तीन मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दुखापतीमुळे माघार घेतली. जागतिक क्रमवारीत 47 व्या स्थानावर असणाऱ्या सतीशची पुढील लढत थायलंडच्या कांताफोन वांगचेरॉनशी होणार आहे. मात्र भारताच्या किरण जॉर्जला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. जपानच्या कांता त्सुनेयामाने त्याचा 21-19, 21-14 असा पराभव केला.
सुमीत रेड्डी व सिक्की रेड्डी यांचे मिश्र दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले. त्यांनीही दुखापतीमुळे माघार घेतली. डेन्मार्कच्या जेस्पर टॉफ्ट व अमेली मॅगलुंड यांच्याविरुद्ध त्यांची लढत होणार होती. महिला दुहेरीत रुतुपर्णा पांडा व श्वेतपर्णा पांडा यांनाही डेन्मार्कच्या ज्युली फिने इप्सेन व माइ सुरॉ यांच्याकडून 8-21, 14-21 असा केवळ 34 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला एकाही बॅडमिंनटपटूने या स्पर्धेत भाग घेतलेला नाही.