सतीश जारकीहोळी यांचा मुख्यमंत्रिपदासाठी प्लान ‘सी’
आश्चर्यकारक विधानामुळे कुतूहल वाढले
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुडा प्रकरणावरून एकीकडे लोकायुक्त, ईडीच्या कारवाईमुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या अडचणीत आले असतानाच त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलन तीव्र केले आहे. याचदरम्यान, राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ दिसून येत आहे. आता सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आणखी कुतूहल निर्माण झाले आहे.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, मुडा प्रकरणात सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशा समजुतीने अनेक मंत्री मीच पुढील मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आमच्यात ए, बी काहीही नाही थेट ‘सी’ प्लॉनची कार्यवाही केली जाईल, असे आश्चर्यकारक विधान केले आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत केवळ राज्याविषयी आणि पुढील निवडणुकीविषयी चर्चा केली आहे. या बैठकीचा ईडी, मुडा गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नाही. संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी आहे. त्यांना सोडून देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
मुडा गैरव्यवहारासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात आहे. याच दरम्यान, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली होत असताना मंत्री डॉ. जी. परमेश्वर, सतीश जारकीहोळी आणि एच. सी. महादेवप्पा यांनी बैठक घेत चर्चा केली आहे. एखाद्या वेळेस सिद्धरामय्यांना राजीनामा द्यावा लागला तर दलित समुदायातील नेत्यालाच मुख्यमंत्री बनविण्यासाठी काँग्रेस हायकमांडवर दबाव आणण्याची तयारी करण्यात आल्याचे समजते