सतीश जारकीहोळींच्या दिल्ली दौऱ्याने उत्सुकता
मंत्री महादेवप्पा यांच्यासमवेत घेतली खर्गेंची भेट
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर
राज्यात नेतृत्त्व बदलाविषयी जोरदार चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी आणि मंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी सोमवारी रात्री एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली आहे. मंत्री जारकीहोळींच्या या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात दिल्लीला गेलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि त्यांचे बंधू, माजी खासदार डी. के. सुरेश यांनी एआयसीसी अध्यक्ष खर्गे यांची भेट घेत त्यांच्याकडे सत्तावाटप कराराची अंमलबजावणी करण्याची विनंती केली होती. याचबरोबर पाच राज्यांचे निकाल जाहीर होणाऱ्या 4 मे पर्यंत निर्णय घेण्याची मागणीही केली होती.
डी. के. शिवकुमार दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच सोमवारी मंत्री सतीश जारकीहोळी आणि डॉ. एच. सी. महादेवप्पा यांनी दिल्लीला जाऊन एआयसीसी अध्यक्ष खर्गे यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळवारीही दोन्ही मंत्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचे समजते.
दिल्लीत एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आम्ही एआयसीसी अध्यक्षांना राज्यातील काँग्रेसमधील संभ्रम दूर करण्याची विनंती केली आहे. हायकमांड सर्व बाबींवर निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.