सतीश जारकीहोळी बेळगाव जिल्हा पालकमंत्री
मंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर कारवार जिल्ह्याची जबाबदारी
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शुक्रवारी सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नेमणूक केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना पूर्वीप्रमाणे यावेळीही बेळगाव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अथणीचे आमदार व सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांच्यावर कारवार जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शनिवारी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आयोजित होणाऱ्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात जिल्हा पालकमंत्र्यांकडून ध्वजारोहण होईल. उपमुख्यमंत्री तसेच महसूल व क्रीडा मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना तुमकूर तर नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्यावर म्हैसूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे अवजड व मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांच्यावर विजापूर जिल्ह्याची, कामगार मंत्री संतोष लाड यांच्यावर धारवाड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
बागलकोट- विजयानंद काशप्पनवर, बेंगळूर शहर-कृष्णभैरेगौडा, बेंगळूर ग्रामीण- के. एच. मुनियप्पा, बेंगळूर दक्षिण-एच. सी. बालकृष्ण, कोलार, रामलिंगारेड्डी, मंगळूर- यु. टी. खादर, बिदर- ईश्वर खंडे, यादगिरी- डॉ. शरणप्रकाश पाटील, कलबुर्गी-प्रियांक खर्गे, गदग-बसवराज रायरेड्डी, मंड्या- एन. चेलुवरायस्वामी, चिक्कबळ्ळापूर- भैरती सुरेश, कोप्पळ-शिवराज तंगडगी, दावणगेरे- एस. एस. मल्लिकार्जुन, चामराजनगर- सी. पुट्टरंगशेट्टी, शिमोगा-मधू बंगारप्पा, हावेरी- रुद्रप्पा लमाणी, बळ्ळारी- बी. नागेंद्र, कोडगू- पी. एम. नरेंद्रस्वामी, हासन- के. एम. शिवलिंगेगौडा, रायचूर- अजय सिंग, उडुपी- रिझवान अर्शद, चित्रदुर्ग- टी. रघुमूर्ती आणि विजयनगर जिल्ह्यासाठी के. एस. बसवंतप्पा यांची जिल्हा पालकमंत्री म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.
मंत्री जमीर अहमद खान यांच्यावर भाजपचे टिकास्त्र
विजयनगर जिल्हा पालकमंत्री म्हणून मंत्री जमीर अहमद खान यांची नेमणूक होणार असल्याचे समजतात त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना पत्र पाठवून आपल्यावर पक्षसंघटनेसह इतर अनेक कामांचा अधिक ताण असल्याने ही जबाबदारी माझ्यावर सोपवू नये, अशी विनंती केली. तसेच शनिवारी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात विजयनगर जिल्ह्यातील ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकवणे शक्य होणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमातून आपल्याला वगळण्याची विनंती केली. मात्र, या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा गौरव करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. त्याऐवजी पक्षाच्या राजकीय कामांना अधिक प्राधान्य देणे योग्य नाही, अशा शब्दात ताशेरे ओढले आहेत.