पुस्तक रसग्रहण स्पर्धेत सतीश धर्णे प्रथम
जिल्हा साहित्य संमेलनांतर्गत स्पर्धा
सावंतवाडी : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित पहिल्या जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त रविवारी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित पुस्तक रसग्रहण स्पर्धेत भेडशी येथील सतीश धर्णे यांनी प्रथम, सावंतवाडी येथील नूतन पावसकर यांनी द्वितीय तर जामसंडे-देवगड येथील प्रज्ञा चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अविनाश पाटील, वैदेही आरोंदेकर, हेमंत पाटकर, वैभव खानोलकर यांनाही उत्तजनार्थ पारितोषिक जाहीर करण्यात आले. हा निकाल उषा परब यांनी जाहीर केला. शिक्षकांसाठी स्पर्धा हा चांगला उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले.पुस्तक तुमच्या मेंदूचा विकास करत असते. जाणीवांचा विकास करत असतात. माणूस म्हणून तुमचे जगणे समृद्ध करण्यास हातभार लावतात. त्यामुळे वाचन संस्कृती जपण्यासाठी पुस्तक रसग्रहण स्पर्धेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी यावेळी केले.व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, श्रीराम वाचन मंदिरचे संचालक बाळ बोर्डेकर, लेखिका उषा परब, परीक्षक प्रा. हर्षवर्धिनी सरदार, प्रा. संतोष पाथरवट, विजय ठाकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले. त्यांनी स्पर्धा आयोजनामागचा उद्देश सांगितला. त्यानंतर स्पर्धकांनी सादरीकरण केले.स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये आणि स्मृतीचिन्ह, पुस्तक, प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५०० रुपये, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक भेट दिले जाणार आहे. पारितोषिक वितरण २८ डिसेंबरला राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात होणार्या जिल्हा साहित्य संमेलनात होणार आहे. यावेळी संचालक राजेश मोंडकर, श्रीराम वाचन मंदिरचे ग्रंथपाल महेंद्र पटेल, महेंद्र सावंत व अन्य उपस्थित होते.