फेब्रुवारीत समाधानकारक इलेक्ट्रीक वाहन विक्री
फाडा संघटनेच्या अहवालात माहिती : ओलाची मोठी घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये फेब्रुवारीचा महिना हा समाधानकारक ठरला आहे. एकंदर सर्व प्रकारातील विक्री पाहता जवळपास 46 टक्के अधिक विक्री इलेक्ट्रिक दुचाकींची, पॅसेंजर वाहनांची विक्री 44 टक्के तर व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने जवळपास 156 टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवली आहे. या साऱ्याला मदत करणाऱ्या तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांनी योगदान देताना फेब्रुवारीत 25 टक्के वाहन विक्रीत वाढ नोंदवली.
ओलाची मोठी घसरण
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात फाडा या संघटनेने या संदर्भातली माहिती दिली आहे. दुचाकी वाहन विक्रीमधील महत्त्वाची घडामोड म्हणजे ओला इलेक्ट्रिकच्या वाहन विक्रीत लक्षणीय झालेली घसरण होय. फेब्रुवारीत यावर्षी 3968 इतक्या कमी वाहनांची विक्री कंपनीने नोंदवली आहे. जी गेल्या चार वर्षांमध्ये नीचांकी पातळीवरची मानली जात आहे. विक्री जवळपास 54 टक्के इतकी घसरली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 8675 दुचाकींची विक्री कंपनीने केली होती. दुसरीकडे एकंदर दुचाकी विक्रीत मात्र 43 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून फेब्रुवारीत 1 लाख 11 हजार 709 दुचाकींची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारीत 76,722 दुचाकी विक्री झाल्या होत्या. महिन्याच्या आधारावर पाहता विक्री 9 टक्क्यांनी वाढीव दिसली आहे.
ओला 6 व्या स्थानी
ओला इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मागे पडली असून यामध्ये आता टीव्हीएस मोटर्स, बजाज ऑटो आणि अॅथर एनर्जी यांनी आघाडी घेतली आहे. टीव्हीएस मोटर्सने फेब्रुवारी महिन्यात 31 हजार 614, बजाज ऑटोने 25,328 तर अॅथर एनर्जीने 20584 दुचाकींची विक्री केली. यायोगे टीव्हीएस मोटर्सने 67 टक्के, बजाज ऑटोने 17 टक्के आणि अॅथर एनर्जीने 72 टक्के वाहन विक्रीत वाढ नोंदवली. मोटोकॉर्प यांनी 12514 आणि ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटी यांनी 4724 वाहनांची विक्री करत हातभार लावला आहे. या आघाडीवरच्या पाच कंपन्या असून दुचाकी विक्रीमध्ये खराब कामगिरीमुळे ओला इलेक्ट्रिक आता सहाव्या क्रमांकावर घसरली आहे.
प्रवासी वाहन विक्रीत टाटाचा दबदबा
दुसरीकडे प्रवासी वाहनांच्या विक्रीचा विचार करता गेल्या फेब्रुवारी महिन्यात 13733 वाहनांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात 9505 वाहनांची विक्री केली गेली होती. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत 44 टक्के वाढ झाली असली तरी याच्या मागच्या जानेवारी महिन्यात यावर्षीच्या विक्रीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीतील विक्रीचे प्रमाण 26 टक्के कमी दिसून आले. याबाबतीत पाहता मासिक वाहन विक्रीमध्ये पुढील तीन कंपन्यांच्या वाहनांचा वाटा 86 टक्के इतका विक्रमी दिसून आला. यात टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू एमजी मोटर आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांनी अनुक्रमे 5568, 3312 व 2913 वाहनांची विक्री केली. फेब्रुवारी महिन्यामध्ये 66,398 तिचाकींची विक्री करण्यात आली आहे. मागच्या वर्षाच्या समान महिन्यातील विक्री पाहता ही वाढ 25 टक्के अधिक आहे.