कंग्राळी बुद्रुक येथील पायवाट दुरुस्त केल्याने समाधान
कंग्राळी बुद्रुक : गावानजीकच्या फुटलेल्या कालव्याचा बंधारा वजा पायवाट खडीमाती टाकून दुरूस्त केल्याने शेतकरी वर्गाला दिलासा दिल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसाच्या पाण्याने सदर कालव्याचा बांध वजा पायवाट फुटली होती. कालवा फुटल्याने पायवाटच बंद झाली होती. याची त्वरित दुरूस्ती करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी वृत्तपत्रातून अनेकवेळा केले होती. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने पायवाट दुरूस्त केल्यामुळेही शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गावच्या तलावाला लागून पश्चिमेकडे जाऊन मार्कंडेय नदीला मिळणाऱ्या या कालव्यातून गावचे संपूर्ण सांडपाणी जाते. पावसाळ्यात याच कालव्यातून पावसाचे पाणी सुद्धा वाहत जाऊन मार्कंडेय नदीला मिळत असते. यासाठी ग्रा. पं. ने पावसाळा सुरू होण्यापूर्वी कालव्याची दुरूस्ती करणे गरजेचे असते. परंतु ग्रा. पं. ने कालवा दुरूस्तीकडे कानडोळा केल्यामुळे कालवा फुटून शेतकऱ्यांची गैरसोय झाली. परंतु आता फुटलेली पायवाट खडीमाती टाकून सुरळीत केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.