अंबाभवननजीकच्या नाल्यावर गेट बसविल्याने समाधान
बेळगाव : नाल्याची सफाई करत असताना अडथळा आल्याने शिवाजी रोड नाल्याची भिंत अंबाभवनजवळ कोपऱ्यावर पाडण्यात आली होती. त्यामुळे सदर नाला नागरिकांसाठी धोकादायक बनल्याने त्याठिकाणी पुन्हा बांधकाम किंवा गेट बसविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार सदर नाल्यावर मंगळवारी महापालिकेकडून गेट बसविण्यात आले आहे. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.पावसामुळे नाल्यातील पाणी वाहून जाण्याऐवजी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते.
त्यामुळे महापालिकेच्यावतीने खबरदारी घेत शहर व उपनगरातील नाले व गटारींची तातडीने सफाई करण्यात आली. मोठ्या नाल्यातील गाळ व केरकचरा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आला. शिवाजी रोडवरील नाल्यातील कचरा काढताना अडथळा निर्माण झाल्याने अंबाभुवनजवळ नाल्यावरील भिंत पाडण्यात आली होती. पोस्टमन सर्कलकडून शिवाजी रोडकडे येणाऱ्या कोपऱ्यावरील भिंत पाडल्याने सदर नाला धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याठिकाणी पुन्हा बांधकाम करण्यात यावे किंवा गेट बसविण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी केल्याने याची दखल घेत मंगळवारी महापालिकेकडून त्याठिकाणी गेट बसविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.