महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झुवारी पुलावर सेटलाईटद्वारे देखरेख

12:51 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मजबुती परीक्षणासाठी वापरणार सेन्सर्स, उपग्रह प्रतिमा : शुक्रवारी दुसऱ्या लेनचे उद्घाटन,त्यानंतर पूर्ण क्षमतेने कार्यरत

Advertisement

पणजी : सुमारे 1500 कोटी ऊपये खर्च करून उभारण्यात आलेला आठ पदरी झुवारी पूल पुढील दोन दिवसात पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असून त्यानंतर या पुलाची नियमित देखरेख, निरीक्षण व परीक्षणासाठी सेन्सर्स, उपग्रह प्रतिमा यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या पुलाच्या एका लेनचे यापूर्वीच लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. आता दि. 22 रोजी दुसऱ्या लेनचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून तो पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या मजबुतीचे निरीक्षण-परीक्षण करून देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने विविध तंत्रज्ञानासाठी स्कॅनिंग प्रारंभ केले आहे.

Advertisement

पुलाचे आयुर्मान 120 वर्षे

बांधकाम कंत्राटदाराने या पुलाचे आयुर्मान तब्बल 120 वर्षे असेल अशी हमी दिली आहे. त्यामुळे तेवढ्या कालावधित हा पूल सुस्थितीत राहील याची खातरजमा साबांखाला करायची आहे. त्यावरून वाहनांची वाहतूक होताना कॉंक्रिटची कंपनता  वारंवार तपासणे आवश्यक असते. त्यासाठी ग्रीडवर सेन्सर सेट करण्यात येणार आहेत. या प्रणालीद्वारे सदर कंपनता मर्यादेत आहे की नाही हे संबंधित अभियंता स्वत:च्या मोबाईल फोनवर कोठुनही तपासू शकेल असे तंत्रज्ञान त्यात असेल. तसेच सॅटेलाईटद्वारे देखरेख ठेवणे हाही एक पर्याय असणार आहे, अशी माहिती साबांखातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. झुवारीवरील जुन्या पुलाने सुमारे 70 वर्षे सेवा दिली. हा पूल बॅलेंस्ड कॅन्टिलिव्हर तंत्रज्ञानाने बांधण्यात आला होता. मात्र हल्लीच्या काही वर्षात वाहनांच्या अमर्याद प्रमाणात वाढणाऱ्या संख्येमुळे तो बराच कमकुवत बनला होता. त्यामुळे या मार्गावर तातडीने नवीन पूल उभारण्याची गरज होती. ती सध्या विद्यमान आठ पदरी पुलामुळे पूर्ण झाली आहे. बांधकाम कंपनीने यापूर्वीच पुलाच्या केबल मजबुतीसाठी निरीक्षण प्रारंभ केले आहे. साबांखा त्याच्या मुख्य संरचनेच्या मजबुतीवर लक्ष ठेवत आहे. हल्लीच एका कंपनीने साबांखातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पुलाच्या देखरेख प्रणालीवर एक सादरीकरणही आयोजित केले होते. भारतात हल्लीच्या वर्षात अनेक केबल-स्टेड पूल बांधण्यात आले असले तरीही त्यांच्या केबल-स्टेड स्ट्रक्चर्सचे तोटे जाणून घेण्यासाठी अद्याप पुरेसा वेळ गेलेला नाही. अन्य राज्यात बॅलेंस्ड कॅन्टिलिव्हर तंत्रज्ञानयुक्त बांधकामांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र गोव्यात खारट हवामानामुळे झुवारी आणि बोरी येथील पूल समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. याच कारणामुळे नव्या झुवारी केबल-स्टेड पुलाचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे, अशी माहितीही सदर अधिकाऱ्याने दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article