फडणवीसांच्या 'काँग्रेस गायब' वर सतेज पाटील यांची प्रतिकिया
कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर मतदासंघातून काँग्रेसने सुरुवातील राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर मोठा विरोध होऊ लागला होता. दरम्यान, काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर काँग्रेसने उत्तर कोल्हापूरमधून मधुरिमाराजे यांना तिकीट दिली. मधुरिमाराजे यांनी अर्ज देखील भरला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपल्याशी कोणतीच चर्चा न करता मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आ. सतेज पाटील संतप्त झाले, 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,मी पण दाखवली असती माझी ताकद,'अशा शब्दात खा.शाहू महाराजांना फटकारले.
कोल्हापूरमधील सर्व घडलेल्या घडामोडीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिकिया दिली आहे. "खरं म्हणजे उत्तर कोल्हापूरमधील सर्व प्रकार आश्चर्यकारक आहे. मात्र तिथे जे काही घडामोडी घडल्या, त्यामधून एक गोष्ट लक्षात आली आहे की, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झाली आहे. हे निश्चितपणे पाहायला मिळत आहे", असं फडणवीस म्हणाले.
त्यावर प्रतिकिया देत सतेज पाटील यांनी मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या प्रमुख घटनांचा पाढाच वाचून दाखवला. "महाराष्ट्रातील जनता मालवणमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान विसरणार नाही. बदलापूरमध्ये एका लहान मुलीवर अत्याचारात कुणी पाठीशी घातलं विसरणार नाही. पुण्यात एका तरुणाला उडवलं गेलं हे विसारणार नाही. शेतकऱ्यांचा सन्मान राखलेला नाही हे विसरणार नाही. त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ते 20 तारखेनंतर गायब होतील," असा खोचक टोला सतेज पाटलांनी लगावला.