विरोधी पक्ष नेतेपदाची माळ Satej Patil यांच्या गळ्यात?, कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट
शिवसेनेचे अंबादास दानवे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते
By : संतोष पाटील
कोल्हापूर : कोल्हापूरचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे अंबादास दानवे यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त आहे.
इंडिया आघाडीने विरोधी पक्षनेता नेमावा, यासाठी मुंबईत आणि कोल्हापुरात आंदोलन केले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी असलेलं थेट कनेक्शन सतेज पाटील यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे. विरोधी पक्षनेते पदाने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा व्टिस्ट आल्यास नवल नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत जुनमध्ये संपली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत दानवे पुन्हा सभागृहात येणार नाहीत. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी निवडीबाबत सत्ताधारी आघाडीने कायदेशीर प्रक्रिया राबवण्यास विलंब केला आहे.
त्यामुळे इंडिया आघाडीने कोल्हापूर आणि मुबंईत मंगळवारी एकाचवेळी आंदोलन केले. या आंदोलनात सतेज पाटील समर्थकांची संख्या अधिक होती. सतेज पाटील यांची काँग्रेसमधील पक्षांतर्गत ताकद, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपदाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
या राजकीय घडामोडीची परिणती सतेज पाटील यांच्या राजकीय वाटचालीची आणि जिह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी होऊ शकते. दरम्यान, होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील राजकारणाचा महत्वाचा टप्पा ठरतील.
सध्या सतेज पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आहेत आणि त्यांना पुणे शहर आणि जिह्याचे निरीक्षक म्हणूनही नियुक्ती देण्यात आली आहे. कोल्हापूरात काँग्रेसला बळकटी देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
अशा परिस्थितीत, विरोधी पक्षनेतेपदाची संधी त्यांच्या राजकीय कसोटीला नवी उंची देऊ शकते. सतेज पाटील यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध या नियुक्तीच्या शक्यतेला बळ देतात. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि उमेदवारीबाबत सतेज पाटील यांनी यशस्वी समन्वय साधला आहे. महाविकास आघाडीचे ते पश्चिम महाराष्ट्रातील तगडे नेते असल्याने या पदावर ते प्रमुख दावेदार असल्याचे मानले जाते.
विधान परिषदेचे राजकारण तापणार
कोल्हापूर विधान परिषदेचे बिगुल 2026 ला वाजणार आहे. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे सोपस्कार पूर्ण व्हावे लागणार आहेत. मात्र, आतापासून आमदार सतेज पाटील यांना घेरण्याची रणनिती आखली जात आहे. सतेज पाटील यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक यांच्या उमेदवारीची घोषणा फेब्रुवारी महिन्यातच केली.
मादनाईक यांनीही काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2009 पासून होऊ घातलेल्या या चौथ्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही सतेज पाटील आणि महाडिक गट आमने-सामने येतील, असे संकेत आतापासूनच मिळत आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेता आणि त्यानिमित्ताने येणारे कॅबिनेट मंत्रिपदाचे अधिकार यामुळे ही निवडणूक याक्षणी वाटते तशी एकतर्फी नक्कीच होणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे.
ठाकरे बंधूंचे मनोमिलन आणि सतेज पाटील यांचे स्थान
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाने कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. मराठी अस्मितेच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असून, याचा परिणाम कोल्हापूरातील मराठा आणि मराठी मतदारांवर होऊ शकतो. सतेज पाटील यांचे राज ठाकरे हे चांगले मित्र आहेत तर उध्दव ठाकरे यांचे लाडके आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सतेज पाटील यांनी यापूर्वीही आक्रमक भूमिका घेतली होती. मराठा कार्ड म्हणून सतेज पाटील यांना फायदा होईल.
तर आव्हानांचा डोंगर
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती झालीच तर त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर असणार आहे. शक्तिपीठ महामार्ग आणि अलमट्टी धरण पाणी साठा विरोधी आंदोलनाला मोठे बळ मिळेल. ही दोन्ही आंदोलने राज्य सरकारची डोकेदुखी आहेत.
विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मात खाल्ल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोल्हापूरसह परिसरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीला उभारी देण्यात पुन्हा योगदान द्यावे लागेल. शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासोबत समन्वय साधणे आणि स्थानिक पातळीवर काँग्रेसची ताकद वाढवणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.