नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी भाजपमध्ये; आमदार सतेज पाटील गटाला धक्का
माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थित केला प्रवेश
कोल्हापूर प्रतिनिधी
नेर्ली (ता करवीर) गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी यांनी मंगळवारी माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. पुजारी यांनी भाजमध्ये प्रवेश केल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण विधानसभा मतदार संघात आमदार सतेज पाटील गटाला धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघा मध्ये आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील व माजी आमदार अमल महाडिक गटामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मंगळवार २३ रोजी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासह माजी आमदार अमल महाडिक प्रचारासाठी दक्षिण विधानसभा मतदार संघ दौऱ्यावर होते. दक्षिणमधील वळीवडे, वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आदी गावांना भेटी देत दुपारच्या सुमारास खासदार मंडलिक व माजी आमदार महाडिक यांचे नेर्ली गावामध्ये आगमन झाले. यावेळी नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी यांनी आमदार सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी खासदार मंडलिक यांना नेर्ली गावामधून मताधिक्य देण्याचे आश्वासन सरपंच पुजारी यांनी दिले. यावेळी तानाजी पाटील, अनिल पंढरे, जितेंद्र संकपाळ, सदाशिव चौगुले, कुष्यात सुतार, भाऊसो पाटील, मकरंद चौगुले, विक्रम पाटील, पोमान्ना पुजारी विष्णु पुजारी, प्रकाश परादून, प्रदीप चौगुले, धनाजी नलवडे, अनिल मांडरेकर, योगेश मांडरेकर, अनिल पाटील आदी उपस्थित होते.