सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि पी.एन.पाटील यांना एकटे पाडण्याची तयारी, जिल्ह्यात नवी राजकीय व्यूहरचनेची तयारी
-सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी.एन.पाटील यांना वगळून उर्वरित नेते एकत्र आणण्याच्या हालचाली
-राज्य पातळीवरील दोन वरिष्ठ नेत्यांची चर्चेची पहिली फेरी पूर्ण
-जिह्याच्या राजकारणाची होणार फेररचना
-पारंपारिक विरोधक दिसणार एका तंबूत
कोल्हापूर ः सर्व राजकीय पक्षांचा लोगो वापरणे.
कोल्हापूर-कृष्णात चौगले
kolhapurpolitics- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूर जिह्यातही नवीन राजकीय व्यूहरचना सुरु झाली आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार पी.एन.पाटील या तिघांना शह देण्यासाठी राज्यातील दोन वरिष्ठ नेत्यांकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने जिह्यातील अन्य नेत्यांची एकत्र मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत जिह्यात नवीन राजकीय समिकरणे उदयास येणार आहेत. परिणामी वर्षानुवर्षे कट्टर पारंपारिक विरोधक म्हणून एकमेकांविरोधात मैदानात दिसणारे नेते आता एकाच तंबूत दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शिंदे गटात जाण्यापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्याशी चर्चा केली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसारमाध्यमांशी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यातून भविष्यात जिह्यात होणाऱया राजकीय बदलांच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. राज्यातील दोन सत्ताधारी नेत्यांनी कोल्हापूर जिह्याच्या राजकारणाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सद्यस्थिती पाहता जिह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे म्हणजेच आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना वगळून जिह्यातील उर्वरित नेत्यांची मोट बांधण्याचा हालचाली गतीमान झाल्या आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी सध्या आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ते शिंदे गट आणि भाजपच्या वाटेवर आहेत. या सर्वांची एकत्रित मोट बांधण्यासाठी राज्यपातळीवरील नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. आगामी काळात पुढील चर्चा करून त्याद्वारे प्रत्येक नेत्यासाठी सोयीचा तोडगा काढला जाणार आहे. आजतागायत जिह्यातील चित्र पाहता पारंपारिक विरोधक असलेले खासदार मंडलिक आणि खासदार महाडिक एकत्र दिसणार आहेत. सद्यस्थितीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तरीही नरकेंचे पन्हाळा तालुक्यातील पारंपारीक विरोधक जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे हे भाजपसोबत असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीसह आगामी विधानसभा निवडणुकीत कोणते धोरण निश्चित करायचे याबाबत राज्यपातळीवरून लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. हेच सोयीचे राजकारण अन्य विधानसभा मतदारसंघातही दिसणार आहे. शाहूवाडी मतदारसंघातील माजी आमदार सत्यजित पाटील व शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील यांची राजकीय अडचण असल्यामुळे ते शिवसेनेसोबतच राहतील. पण जिह्यातील दोन्ही खासदार आणि आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून जिह्याच्या आगामी राजकारणात आमदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना कडवा विरोध करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
मुंबई येथे लवकरच बैठक
राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्वरीत राज्यपातळीवरील दोन नेत्यांकडून भाजप आणि शिंदे गटात दाखल झालेल्या आणि येण्यासाठी इच्छूक असलेल्या जिह्यातील नेत्यांची बैठक घेतली जाणार आहे. यामध्ये त्यांना आगामी सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा राजकीय स्वार्थ कशा पद्धतीने साधला जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार असल्याचे समजते.