For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव; ‘जनादेशाचा अनादर करून सत्ता चोरली जात आहे’; ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; सतेज पाटील आक्रमक

01:07 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव  ‘जनादेशाचा अनादर करून सत्ता चोरली जात आहे’  ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  सतेज पाटील आक्रमक
Advertisement

मुंबई : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात संघर्ष तीव्र झाला आहे. राज्य सरकारने गोकुळ दूध संघात शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची घोषणा केली. येत्या ९ नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या कोरमचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या निवडीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. या निर्णयाला सतेज पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जनादेशाचा अनादर होत असल्याचा आरोप केला. निकाल अनुकूल लागला नाही म्हणून कायद्यात बदल केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणुकीपूर्वीच कायद्यात बदल करायला हवा होता, असेही ते म्हणाले.

Advertisement

पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांचे १० महत्त्वाचे मुद्दे

१. कायद्यात बदलावर आक्षेप : निवडणुकीचा निकाल अनुकूल लागला नाही म्हणून कायद्यात बदल केला जात असल्याचा आरोप. गोकुळमध्ये निवडणुकीपूर्वीच कायद्यात बदल करायला हवा होता, असे मत.

२. तज्ज्ञ संचालक नियुक्तीवर टीका : मतदारांनी नाकारलेल्या व्यक्तींना तज्ज्ञ संचालक म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत या नियुक्तीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

३. गोकुळच्या नियंत्रणाबाबत आरोप : गोकुळ दूध संघाला अमूलच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप.

४. हसन मुश्रीफ यांच्यावर नाराजी : हसन मुश्रीफ यांच्याशी आता मैत्री राहिली नसल्याचे सांगत त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप केला.

५. बॅकडोअर एन्ट्रीचा आरोप : शासननियुक्त संचालकांच्या माध्यमातून मागच्या दाराने प्रवेश करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका.

६. अमूलच्या प्रकरणाचा संदर्भ : अमूलमध्येही अशाच प्रकारे संचालक नियुक्त करण्यात आले होते; मात्र उच्च न्यायालयाने त्यांना नाकारल्याचा दावा.

७. उत्पादकांच्या जनादेशाचा उल्लेख : जनता आणि दूध उत्पादकांनी महायुतीला नाकारले असून त्यांच्या मताला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन.

८. एका मताचे महत्त्व : अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडल्याचा संदर्भ देत गोकुळमध्येही एका मताचे महत्त्व असल्याचे सांगितले.

९. महापालिकेतील नियुक्त्यांवर इशारा : स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांद्वारे महापालिकेतही अशाच पद्धतीने सत्ता स्थापन केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली.

१०. लोकशाही आणि आंदोलन : राहुल गांधी यांनी देशात व्होट चोरीविरोधात वातावरण निर्माण केले असताना आता थेट सत्ता चोरी होत असल्याचा आरोप. सरकार लोकशाही व्यवस्था कमकुवत करत असल्याचे सांगत ९ नोव्हेंबरच्या मोर्चाची घोषणा.

गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेला हा संघर्ष आता कायदेशीर लढाईसोबतच आंदोलनाच्या दिशेनेही पुढे जात आहे. शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतचा निर्णय आणि त्याविरोधातील सतेज पाटील यांची भूमिका यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.