महायुतीचे मंत्री शेताच्या बांधावर दिसलेले नाहीत, सतेज पाटलांनी राज्यसरकारला झापलं
शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी
कोल्हापूर : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून महायुती सरकारचा एकही मंत्री किंवा नेता शेताच्या बांधावर दिसलेले नाहीत. कृषिमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांचं सांत्वन केलेलं नाही. सत्ताधाऱ्यांना सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागेल आहेत, त्यामुळे महापालिकेत कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चांमध्ये नेते व्यस्त आहेत. शेतकऱ्याचं नुकसानीची काहीच चिंता नाही, असा घणाघात कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला. आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. विरोधी पक्ष म्हणून आम्हीच शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमदार पाटील म्हणाले, मागील आठ दिवसांपासून राज्यामध्ये अलर्ट होता. अलर्ट असूनसुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालु होता. कृषी विभागाने वेळीच गांभीर्य ओळखून संप दुर्लक्षित केला असता तर आतापर्यंत राज्यातले 50 टक्के शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असते.
मुळात राज्यशासनाने ताबडतोब कृषी सहायकांच्या विषयासंदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते. डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर मागण्या मान्य करणे, म्हणजे शासनाची शेतकऱ्यांबाबतीत असणारी भूमिका दिसून येते. त्यामुळे आता वेळ झालाच आहे तर शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
राज्यात दहा दिवसांपूर्वी अलर्ट होता. शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचं होते. परंतु दुर्दैवाने सरकारला आता जाग आली आहे. आजपासून नुकसानीचे पंचनामे सुरु होणार आहेत. त्यामुळे महसूल आणि कृषी खात्याने 100 टक्के पंचनामे करावेत अशी विरोधी पक्ष म्हणून आमची मागणी आहे.
आज एखादे पिकं हिरवे दिसत असले तरी आठ दिवसात ते पिकं कुजणार आहे. त्यामुळे कोल्हापूर असुदे किंवा राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी असुदेत सरसकट पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्तांसाठी सानुग्र अनुदानाचीही ताबडतोब मंजूरी द्यावी, असेही त्यांनी सूचविले आहे.