'CM फडणवीसांनी कॉंग्रेसवर टीका करण्यापेक्षा मूळ विषयावर बोलावे'
सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र...
कोल्हापूर : दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर बोलावे असा टोला, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. काँग्रेसच्या वतीने काढलेल्या तिरंगा यात्रेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्यदल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे सैन्यदलाच्या सन्मानार्थ कॉंग्रेसकडून तिरंगा यात्रा काढत असल्याचे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर, भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. यावर ते म्हणाले, जे सत्य आहे ते जनतेसमोर आले पाहिजे.
काँग्रेस नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केलेत. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी आहे. यावर भाजपने बोलले पाहिजे. फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेवर ते म्हणाले, काँग्रेसवर टीका करून पहलगाम हल्ल्याचा विषय दूसरीकडे घेऊन सैन्य दलाला पाठबळ देऊन सैनिकांचे मनोबल वाढवणे ही काँग्रेसची भूमिका आहे.
शस्त्रसंधी देशाच्या पंतप्रधानांनी जाहीर करणे गरजेच असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी जाहीर करतात. जनतेसमोर ही सर्व माहिती आली पाहिजे. या मुद्यावर लोकसभेत चर्चा झाली पाहिजे. शस्त्रसंधीबाबत जे निर्णय घेतले ते उघडपणे सांगितले पाहिजे. पहलगाम हल्ल्याचे राजकारण करून भाजपकडून गांधी परिवारावर होत असलेली टीका दुर्दैवी आहे.
सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र भाजपचे मंत्री विजय शहा यांचे विधान पाहता, भाजपने त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. केवळ सैनिकांच्या प्रति भावना दाखवण्यासाठी भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात येते. मात्र आम्ही प्रत्यक्ष सैनिकांसोबत आहोत असे पाटील म्हणाले.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, भाजपने ऑपरेशन सिंदूरला राजकीय स्वरूप देण्याची आवश्यकता नाही. भाजपकडून पहलगाम हल्ल्याचे राजकारण होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यामागील सर्व सत्य बाहेर आले पाहिजे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसने केली आहे