For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'गोकुळमध्ये मला कसाही वेढा घातला तरी त्यातून बाहेर पडणार’; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी सतेज पाटील यांचे सूचक विधान

12:10 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
 गोकुळमध्ये मला कसाही वेढा घातला तरी त्यातून बाहेर पडणार’  अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी सतेज पाटील यांचे सूचक विधान
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारच्या शासननियुक्त संचालकांच्या निर्णयामुळे सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसमोरील आव्हाने वाढली असतानाच, आमदार सतेज पाटील यांनी या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ‘गोकुळमध्ये मला कसाही वेढा घातला तरी त्यातून बाहेर पडणार’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्ह्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना सतेज पाटील यांनी गोकुळमधील राजकीय परिस्थितीचा संदर्भ दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारचा वेढा असला तरी त्यातून बाहेर पडण्याची शिकवण दिली आहे. त्याच प्रेरणेने आपणही गोकुळमधील परिस्थितीतून मार्ग काढू, असे सूचक विधान त्यांनी केले.

गोकुळमध्ये सत्तासंघर्ष तीव्र

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 जागा जिंकल्या, तर महायुतीच्या पॅनेलला 12 जागा मिळाल्या. त्यामुळे संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या आघाडीला निसटते बहुमत मिळाले आहे. अध्यक्षपद मिळविण्यासाठी आघाडीकडून प्रयत्न सुरू असताना महायुतीनेही आपली राजकीय रणनीती कायम ठेवली आहे.

Advertisement

दरम्यान, राज्य सरकारने गोकुळमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या निर्णयानुसार चार राजकीय आणि एका शासकीय संचालकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित संचालकांना मतदानाचा अधिकार असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

अध्यक्षपदाची निवड कायदेशीर पेचात?

सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 आणि महायुतीचे 12 संचालक अशी स्थिती असताना शासननियुक्त संचालकांच्या समावेशामुळे गोकुळमधील सत्तासमीकरणे बदलू शकतात. त्यामुळे अध्यक्षपद महायुतीकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर प्रक्रियेत अडकू शकते. गोकुळमध्ये अध्यक्ष निवडीसाठी 14 संचालकांचा कोरम आवश्यक असल्याचे सांगितले जात असले, तरी हा तांत्रिक मुद्दा असल्याचे सतेज पाटील यांचे मत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबर रोजी गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाचा नेमका काय परिणाम होणार, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.