Gokul Election : अविश्वास ठराव, पक्षीय राजकारण... डोंगळेंच्या भूमिकेवर सतेज पाटील काय म्हणाले?
सतेज पाटील यांनी यासंदर्भात डोंगळे यांचा खरपूस समाचार घेतला
कोल्हापूर : सध्या गोकुळ दूध संस्थेत अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राजकीय नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सध्याचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पदाचा राजीनामा देण्यास थेट नकार दिल्याने गोकुळचे वातावरण तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राजीनामा न देण्याच्या सूचना आल्या असल्याचे वक्तव्य डोंगळे यांनी केले आहे. यानंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, आज कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांनी यासंदर्भात डोंगळे यांचा खरपूस समाचार घेतला.
कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधनाता सतेज पाटील म्हणाले, गोकुळ संस्थेच्या निवडणूका किंवा गोकुळ संस्था या सहकारी तत्वावर चालतात. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलंय असं वाटत नाही. फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद दोन-दोन वर्षे असेल असं ठरलं होतं. 15 मेपर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती. अजून ही आहे. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे गोकुळमध्ये महाविकास आघाडीचा अध्यक्ष नको डोंगळेंच्या या वक्तव्यावर पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये हसन मुश्रीफ आणि मी एकत्रित असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांविरोधात आहोत. कारण सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं. हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल, असा टोला त्यांनी लगावला आहे. या सर्वातून आज मार्ग निघेल, असंही ते म्हणाले.
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूकांबाबत ते म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणुका टेस्ट म्हणून असतात. पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत. येत्या सहा महिन्यात नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. दूध दरवाढीबाबत दिलेला शब्द पाळून आम्ही दरवाढ केली आहे. गोकुळ कोणाच्याही हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार हे शेतकऱ्यांना माहिती असतं. अध्यक्षपदाबाबत अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही, हा प्रश्न सामंजस्यने मिटेल. सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढलो होतो, त्यामुळे फाटाफूट होण्याचा प्रश्न येत नाही.