For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातारच्या पोरांचं ‘गणित पक्कं’

03:49 PM Jan 30, 2025 IST | Radhika Patil
सातारच्या पोरांचं ‘गणित पक्कं’
Advertisement

सातारा : 

Advertisement

प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने असर 2024 चा अहवाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सातारा जिह्यातील विद्यार्थी गणित विषयाच्या संपादणुकीमध्ये राज्यात अव्वल ठरले आहेत तर भाषा विषयाच्या संपादणुकीमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकावर सातारा आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हे असर- न्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्सचे सर्वेक्षण दर दोन वर्षांनी करते. हे सर्वेक्षण हे पूर्णत: बाह्य यंत्रणेमार्फत केले जाते. त्यामुळे साताऱ्याची पोरं गणितात हुशार ठरली आहेत.

प्रथमने 2024 चा असर अहवाल आज जाहीर केला आहे. त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीच्या भाषेमध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 50.3 असून सातारा जिह्याची सरासरी संपादणूक 79.3 आहे तर इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपन्न 46.2 असून सातारा राज्यात अव्वल असून सरासरी संपादणूक 84.7 आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या भाषा विषयाची महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 69.4 असून साताऱ्याची सरासरी 90.4 आहे तर गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 35.4 एवढी असून सातारा गणितामध्ये राज्यात अव्वल असून सरासरी संपादणूक 63.5 इतकी आहे. असर 2022 मध्ये महाराष्ट्रात सरासरी संपादणुकीमध्ये सातारा इयत्ता तिसरी ते पाचवीच्या भाषेत आणि गणितामध्ये 8 व्या क्रमांकावर, इयत्ता सहावी ते आठवीच्या भाषा विषयाच्या सरासरी संपादणुकीमध्ये महाराष्ट्रात सातारा 5 व्या स्थानी तर गणितात 8 व्या स्थानी होता. गेल्या वर्षापासून राबविलेल्या आदर्श शाळा उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवल्यामुळे जिह्याची शैक्षणिक प्रगती झाल्याचे दिसून येते.

Advertisement

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासूनच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाची अंमलबजावणीचे नियोजन केले. त्यानुसार एकूण 16 अभ्यास गटांची निर्मिती करून त्यांच्यामार्फत उपक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी जिह्यामधील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली. या कार्यक्रमांतर्गत गुढीपाडवा पट वाढवा, इयत्ता चौथी व इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा, इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग, यशवंत प्रयोगशाळा सक्षमीकरण, ज्ञानचक्षु वाचनालय सक्षमीकरण, परसबाग निर्मिती,आनंददायी अभ्यासक्रम निर्मिती या उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे असर 2024 मध्ये सातारा जिह्याने राज्यामध्ये अव्वल कामगिरी केली आहे.

जिल्हा अव्वल ठरला आहे
सातारा जिह्याने आदर्श शाळा उपक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली आहे. जिह्यातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, सर्व अधिकारी व डायट यांनी संघटितपणे कार्य केल्याने असर 2024 मध्ये सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
                                                                     याशनी नागराजन सीईओ, जिल्हा परिषद सातारा

आमच्या शिक्षकांचे प्रयत्न सुरु असतात
आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी शिक्षक अथक प्रयत्न करतात. वेगवेगळे उपक्रम शिक्षक राबवत असतात. त्यांच्या प्रयत्नांचेच हे फलित आहे. राज्यात गणित आणि भाषा या विषयात आमचे विद्यार्थी हुशार असल्याचे असरच्या अहवालात आढळून आले याचा आम्हाला आनंद आहे.
                                                                     शबनम मुजावर, प्राथमिक शिक्षणाधिकारी

पालकांचेही अभिनंदन
तुम्ही सातारा जिह्यातील पालकवर्गांनीही चांगला अभ्यास आपल्या पाल्यांकडून करवून घेतला. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी सुद्धा चांगले चमकू लागलेले आहेत. यामध्ये तुम्हा पालकांचा सहभाग आहे. त्यामुळे पालकांचेही अभिनंदन.
                                                                            प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

Advertisement
Tags :

.