For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांना आवरा; ग्रामसभेत चिंता; गुरे गोठ्यात बांधण्याचे पोलिसांचे आवाहन

02:07 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सातार्डा पंचक्रोशीत मोकाट गुरांना आवरा  ग्रामसभेत चिंता  गुरे गोठ्यात बांधण्याचे पोलिसांचे आवाहन
Advertisement
सातार्डा : सातार्डा पंचक्रोशीमध्ये मोकाट गुरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, तरुण गंभीर जखमी होण्याबरोबरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोकाट गुरांच्या मालकांनी आवश्यक दक्षता घ्यावी, असे निर्देश सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी दिले.

सातार्डा येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी सरपंच संदीप प्रभू, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, दशरथ वेंगुर्लेकर, पोलीस पाटील विनिता मयेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर तसेच शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

महाराष्ट्र-गोवा सीमेवर असलेल्या सातार्डा गावात गेल्या वीस वर्षांपासून मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांमुळे अपघात होऊन तरुण गंभीर जखमी होत आहेत. मोकाट गुरांकडून शेतीचे नुकसान होत असून व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे.

कोंडवाडा असूनही मोकाट गुरांचा बंदोबस्त कठीण

Advertisement

मोकाट गुरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, गुरांचे मालक या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामसभेत व्यक्त करण्यात आल्या. कोंडवाड्याची इमारत उपलब्ध असूनही मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे कठीण असल्याचे सरपंच संदीप प्रभू आणि पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये यांनी सांगितले. मोकाट गुरांना ओळखण्यासाठी बिल्ले टोचण्याचा पर्यायही उदय पारिपत्ये यांनी ग्रामसभेत मांडला.

गुरे गोशाळेत जमा करण्याचे आवाहन

गुरांच्या मालकांच्या समस्या पोलिसांनी ग्रामसभेत ऐकून घेतल्या. गुरे सांभाळण्याची क्षमता नसलेल्या मालकांनी स्वखुशीने ती गोशाळेत जमा करावीत. तसेच गुरांना सायंकाळी वेळेत गोठ्यात बांधून ठेवावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे यांनी केले.

मोकाट गुरांमुळे अपघात होणार नाहीत तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुरांच्या मालकांनी जबाबदारीने वागावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेचे आभार सरपंच संदीप प्रभू यांनी मानले.

Advertisement
Tags :

.